शिवसेना चिन्हावर शरद पवारांची सावध खेळी; म्हणाले, ‘आत्ताच बोलणं योग्य नाही…’

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, अशी सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

बारामतीतील माळेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने निकाल येण्यापूर्वी कोणत्याही बाजूने प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या असून, सरकारने स्वीकारलेल्या धोरणातील त्रुटी न्यायालयानेही निदर्शनास आणून दिल्या आहेत. निर्णय घेताना योग्य प्रक्रिया पाळली नाही, तर न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागू शकतो, असा संदेश सरकारला मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.



साखर आयातीवर पवारांचा सवाल

साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून साखर आयात करण्याच्या निर्णयावरही शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. साखर आयातीमुळे ग्राहकांना किंवा बाजाराला तात्पुरता फायदा होऊ शकतो; मात्र त्याचा देशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

राज्यातील काही भागांत पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीच्या नुकसानीबरोबरच भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले.

दूध भेसळीवरील कारवाईचा परिणाम

दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे भेसळीचे प्रमाण कमी झाले असले, तरी त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही झाल्याचे पवार यांनी नमूद केले. या प्रश्नाकडे सरकारने व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावरही सावध प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे मंत्री आंदोलकांची भेट घेणार आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होते आणि त्यातून कोणता मार्ग निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अशी सावध प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Sharad Pawar on Shiv Sena symbol row: Better not to comment before the verdict

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात