कागलची ‘शाहू सृष्टी’ होणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ; हसन मुश्रीफ यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव असलेल्या कागलमध्ये त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक सुधारणांच्या वारशाचा परिचय पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ संग्रहालयापुरता मर्यादित न ठेवता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सांगड घालणारे जागतिक दर्जाचे आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. Hasan Mushrif

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात ‘शाहू सृष्टी’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, तो तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी कागल नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाचा थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.

या बैठकीस शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, शाहू कारखाना संचालक युवराज पाटील, विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालक एम. पी. पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रकाश गाडेकर, आनंदा पसारे, गजानन माने, शिवाजी मोरे, भिकाजी देवकर, विकास पाटील आदी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानातून शाहू महाराजांचा वारसा उलगडणार

मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावित सुविधा आणि विकास आराखड्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

‘शाहू सृष्टी’मध्ये राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य, सामाजिक विचार आणि त्यांचा समतावादी वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटक आणि विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येणार आहे. यासोबतच पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणारे स्वतंत्र पर्यटक सुविधा क्षेत्र विकसित केले जाणार आहे.

प्रकल्पामध्ये संग्रहालय, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, डिजिटल माहिती केंद्र, प्रदर्शन दालने, अॅम्फिथिएटर, स्थानिक खाद्यपदार्थांची दुकाने, स्मृतिचिन्हांची दुकाने, अॅडव्हेंचर पार्क, क्लब हाऊस आणि पर्यटन निवासाची सुविधा प्रस्तावित आहे.



शिक्षण आणि संशोधनासाठीही स्वतंत्र केंद्र

शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग आणि लोककल्याण क्षेत्रातील योगदान आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने मांडण्यात येणार आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांची माहिती पर्यटकांसोबतच विद्यार्थ्यांनाही मिळावी, यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याची योजना आहे.

संशोधन, अध्ययन आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र प्रशासकीय आणि शैक्षणिक केंद्र उभारण्याची संकल्पनाही प्रकल्पाच्या आराखड्यात मांडण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्र्यांसमोरही सादरीकरण

‘शाहू सृष्टी’ प्रकल्पाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कागलच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी, समतावादी आणि सामाजिक न्यायाचा विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे.

‘शाहू सृष्टी’चे आर्किटेक्ट आदित्य बेगमपुरे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

Develop Kagal’s ‘Shahu Srushti’ as a World-Class Tourist Destination: Hasan Mushrif

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात