९६ सेकंदांत १९ लाथा-बुक्क्या अन् डोक्यात १२ वेळा वीट मारली; शाळेत चिमुरडीला तिसरीच्या मुलाची अमानुष मारहाण, पण त्या निष्पापाने मृत्यूलाही हरवलं!

 

पंचकुला (हरियाणा): शाळा म्हणजे मुलांसाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते; मात्र हरियाणातील पंचकुला येथील एका नामवंत शाळेत घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. सेक्टर-२० मधील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये केजी (KG) वर्गात शिकणाऱ्या अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरडीवर तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाने असा काही निर्दयी हल्ला चढवला की पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अवघ्या ९६ सेकंदांत या मुलाने मुलीचे डोके बाकावर आपटले, चेहऱ्यावर १९ वेळा लाथा-बुक्क्या मारल्या, केस पकडून फरफटत नेले आणि तब्बल १२ वेळा तिच्या डोक्यावर व तोंडावर विटांनी सपासप वार केले.

शाळेतील वर्गामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात हा संपूर्ण थरार कैद झाला असून, फुटेज पाहून राज्याचे शिक्षणमंत्री महिपाल ढांडा यांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, चंदीगडच्या पीजीआय (PGI) रुग्णालयात अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर या नन्ही परीने मृत्यूला मात दिली असून, तिने पहिल्यांदा आईच्या मांडीवर बसून खिचडीचा घास खाल्ला आहे.

९६ सेकंदांचा क्रूर थरार: CCTV मध्ये काय कैद झाले?

वर्गात इतर कोणीही नसताना तिसरीतील ८ वर्षांच्या मुलाने ६ वर्षांच्या चिमुकलीवर सलग ९६ सेकंद कसा हल्ला केला, याचा अंगावर काटा आणणारा क्रमवार घटनाक्रम समोर आला आहे:

व्हिडिओच्या सुरुवातीला हा मुलगा चिमुरडीला पकडून वर्गातील बाकावर तिचे डोके सलग २ वेळा अत्यंत जोरात आपटतो. त्यानंतर तिचे केस पकडून तिला जमिनीवर फेकतो.

मुलगी वेदनेने विव्हळत जमिनीवर पडताच मुलगा तिच्या डोक्यावर आणि पोटावर सलग ३ वेळा लाथा मारतो. मुलगी उठून पळण्याचा प्रयत्न करते, मात्र मुलगा वर्गाच्या कोपऱ्यात पडलेली वीट उचलून आणतो. मुलगा ती जड वीट थेट मुलीच्या चेहऱ्यावर फेकून मारतो आणि तिच्या डोक्यावरही वार करतो. चिमुरडी डोके धरून आक्रोश करू लागते.

केस पकडून पुन्हा आपटले

आरोपी मुलगा पुन्हा तिचे केस पकडून तिला फरफटत नेतो आणि जमिनीवर आदळतो. त्यानंतर तिच्या पोटावर पाय देऊन दोन वेळा लाथा मारतो. मुलगी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून तडफडत असतानाही मुलाचे समाधान होत नाही. तो पुन्हा पुन्हा वीट उचलून तिच्या डोक्यावर, तोंडावर आणि चेहऱ्यावर तब्बल १२ वेळा जोरदार प्रहार करतो. हल्ला करून बाहेर पडतानाही मुलगा तिच्या डोक्यावर पुन्हा विटेचा वार करतो आणि डोक्यात ३ वेळा लाथ मारून शांतपणे निघून जातो.

ऑटोचालक शाळेत पोहोचला अन् भयानक कांड उघडकीस आले!

शाळा सुटल्यानंतर चिमुरडीला घेण्यासाठी नेहमीप्रमाणे ऑटोचालक शाळेत पोहोचला. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी न दिसल्याने त्याने तात्काळ तिच्या कुटुंबीयांना फोन केला. घाबरलेले कुटुंबीय तातडीने शाळेत धावून आले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली.

मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत शोध घेत असताना हल्ला करणाऱ्या तिसरीतील मुलानेच मुलगी रक्ताच्या थारोळ्यात कुठे पडली आहे, ते सांगितले.

चिमुरडीला तात्काळ स्थानिक सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डोक्याला आणि मेंदूला झालेली गंभीर दुखापत, अतिरक्तस्राव आणि नाजूक प्रकृती पाहता डॉक्टरांनी तिला तात्काळ ‘पीजीआय चंदीगड’ (PGI Chandigarh) येथे व्हेंटिलेटरवर हलवले.

शिक्षणमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

शाळेतील या क्रूर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणाचे शिक्षणमंत्री महिपाल ढांडा यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. “हा व्हिडिओ इतका विचलित करणारा आहे की तो सलग पाहणेही मानवी मनाला शक्य नाही,” असे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी तात्काळ उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह

प्राथमिक शाळेत एवढ्या लहान मुलांमध्ये इतकी विकृती कुठून आली? वर्गात वीट किंवा कुंड्यांचे तुकडे कसे आले? आणि ९६ सेकंद एका निष्पाप मुलीचा जीव धोक्यात असताना शाळेचे शिक्षक, सुरक्षारक्षक किंवा आया कुठे होत्या? असे संतप्त सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

देशभरातील कोट्यवधी प्रार्थना फळाला; चिमुकलीने मृत्यूला दिली मात

अनेक दिवस मृत्यूच्या दाढेत असलेल्या या चिमुरडीसाठी देशभरातून सोशल मीडिया आणि मंदिरांमधून प्रार्थना केल्या जात होत्या. अखेर या प्रार्थनांना यश आले असून, पीजीआयमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मुलीच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आहे.

चिमुरडी धोक्याच्या बाहेर आल्यानंतर अनेक दिवसांनी तिने पहिल्यांदा तोंडाने अन्न ग्रहण केले. आईच्या कुशीत बसून तिने जेव्हा खिचडीचा पहिला घास घेतला, तेव्हा तिच्या माता-पित्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हा प्रसंग संपूर्ण कुटुंबासाठी एका चमत्कारापेक्षा कमी नव्हता.

मुलीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिच्या पालकांनी एक भावूक व्हिडिओ जारी करत देशभरातील नागरिकांचे, डॉक्टरांचे आणि प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

Panchkula School Assault: 6-Year-Old Girl Attacked With Bricks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात