विशेष प्रतिनिधी
पुणे: चाकण औद्योगिक वसाहतीतील भीषण वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या सुमारे २० लघुउद्योगांनी कंपन्या बंद करण्याची किंवा स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. Uday Samant
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि ३१ ऑगस्टपर्यंत परिसरातील सर्व खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येणार असून, तातडीच्या दुरुस्तीसाठी आरएमसीसारख्या साहित्याचा वापर केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
वेळेत काम न करणाऱ्या रस्ते कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला.चाकणमधील अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी रस्ते रुंद करण्यात येणार असून वीज उपकेंद्रांची क्षमताही वाढवण्यात येणार आहे.
चाकणमध्ये स्वतंत्र ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच MIDC कडून रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा देण्यात येणार असून त्यासंबंधी पीएमआरडीए निविदा प्रक्रिया राबवेल.
उद्योजकांनी मांडलेल्या प्रमुख पायाभूत सुविधा विषयक कामांसाठी सरकारने १० महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. पुणे जिल्हाधिकारी दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेणार आहेत. उद्योगमंत्री सामंत यांनी स्वतः दर दोन महिन्यांनी प्रगतीचा आढावा घेण्याची ग्वाही दिली.
चाकण MIDC मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येणार आहेत.या प्रश्नाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील चाकणला भेट देणार, अशी माहिती सामंत यांनी दिली.
चाकणमधून उद्योग बाहेर जाण्याची भीती निर्माण झाल्यानंतर सरकारने आता तातडीच्या घोषणांची मालिका केली आहे. मात्र, उद्योजकांचे लक्ष आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते याकडे लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App