‘कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग’; प्रताप सरनाईकांचा मोठा दावा

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा रंगली आहे. धाराशिवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग’ असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे यांच्या शिवसेनेत जूनमध्ये उद्धव ठाकरे गटातील सहा लोकसभा सदस्यांनी प्रवेश केला होता. त्यावेळी शिंदे यांनी या राजकीय घडामोडीला ‘ऑपरेशन टायगर’चे यश म्हटले होते.
आता सरनाईक यांनी कैलास पाटील यांचे नाव घेतल्याने या मोहिमेचा पुढचा टप्पा आमदारांपर्यंत जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सीसीटीव्ही आरोपांवरून जुंपली या वादाची सुरुवात तुळजापूरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून झाली.



कैलास पाटील यांनी तुळजापूर येथे केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या एका चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे सरनाईक यांच्या आदेशावरून बसवण्यात आल्याचा आरोप केला होता.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी पाटील प्रसिद्धीसाठी आरोप करत असल्याचे म्हटले आणि त्यांच्यावर राजकीय टोला लगावला.

“कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहेत,” असा दावा सरनाईक यांनी केला. संबंधित वक्तव्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर समोर आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरूनच सरनाईक यांनी मिश्किल टिप्पणी केली. पाटील कधी कुठे जातात, घरी कधी असतात किंवा तुळजापूरला कधी येतात, हे आता कॅमेऱ्यांतून पाहिले जाईल आणि त्याच माहितीच्या आधारे ‘ऑपरेशन टायगर यशस्वी करू’, असा टोला त्यांनी लगावला.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच सरनाईक यांनी चाकण औद्योगिक पट्ट्यातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरही भूमिका मांडली. खड्डे आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे उद्योजक त्रस्त आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी मान्य केले.

उद्योजकांच्या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत १६ ऑगस्ट रोजी चाकणमधील उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत.
ही बैठक दुपारी ४ वाजता होणार असून रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे.

सरनाईक यांनी या बैठकीत उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन सरकारकडून योग्य मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘Kailas Patil Is Part Two of Operation Tiger’: Pratap Sarnaik Makes Big Claim

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात