तुकाराम मुंढेंचा FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंबईत बनावट दूध कारखाना उद्ध्वस्त, Blinkitच्या गोदामावरही धाड; नेमकं काय सापडलं?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे. मुंबईत FDA आणि पोलिसांकडून दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. दहिसर पूर्व भागात अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट दूध तयार करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मालाडमधील Blink Commerce Pvt. Ltd. (Blinkit) च्या गोदामावर FDAने छापा टाकत अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

दहिसरमध्ये बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-12 ने दहिसर पूर्व परिसरात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीवर कारवाई केली. या कारवाईत चार पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला. नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या उघडून त्यातील दूध काढले जात होते. त्यानंतर त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून पुन्हा दूधाच्या पिशव्या सील केल्या जात होत्या. या पिशव्या अस्सल असल्याचे भासवून बाजारात विक्रीसाठी पाठवण्याची तयारी केली जात होती.

470 लिटर भेसळयुक्त दूध जप्त

पोलिसांच्या कारवाईत अमूल आणि गोकुळच्या नावाने तयार करण्यात आलेले सुमारे 470 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. याशिवाय अमूलच्या नावाच्या तब्बल 13 हजार बनावट रिकाम्या पिशव्या, प्लास्टिक साहित्य आणि दूध भेसळीसाठी वापरली जाणारी साधनसामग्री पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

बनावट दूध पिशव्या तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशिनरीही जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत 10 लाख रुपये असल्याची माहिती आहे. आरोपींकडून चार मोबाइल फोनही जप्त करण्यात आले आहेत.

महिन्याला 30 हजार पाऊचची विक्री?

प्राथमिक तपासात या रॅकेटबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींकडून दर महिन्याला अंदाजे 30 हजार बनावट दूध पाऊच तयार करून विक्री केली जात असल्याचा संशय आहे. आतापर्यंत सुमारे 20 लाख पाऊचची विक्री झाल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे.

या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाचा विस्तार केला असून वसई पूर्व, पालघर येथील बनावट दूध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावरही छापा टाकण्यात आला आहे.

मुख्य आरोपीला तेलंगणातून ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मुख्य आरोपी 2021 पासून मुंबई आणि मुंबई उपनगरात बनावट दूध पिशव्या तयार करण्याच्या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

पोलिसांकडून आता या संपूर्ण यंत्रणेची पाळेमुळे शोधण्याचे काम सुरू असून भेसळयुक्त दूध तयार करून त्याची विक्री करणारे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्नसुरक्षा आणि मानदे कायद्यासह विविध कलमांखाली कारवाई सुरू आहे.



Blinkitच्या मालाड गोदामावर FDAची धाड

दरम्यान, FDAने मुंबईतील मालाड परिसरातील Blink Commerce Pvt. Ltd.च्या गोदामावरही मोठी कारवाई केली आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी FDA अधिकाऱ्यांनी या गोदामाची तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या साठवणुकीबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

गोदामात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती, मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आढळली. काही अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचेही तपासणीत दिसून आले.

मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा

FDAच्या तपासणीत कोल्ड स्टोरेजची स्वच्छता अपुरी असल्याचे आढळले. त्याचबरोबर मुदतबाह्य पॅकबंद अन्नपदार्थांचा साठा गोदामात आढळला.

अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या FIFO/FEFO पद्धतीचे पालन केले जात नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. अन्नपदार्थ ठेवण्याच्या आणि हाताळण्याच्या ठिकाणी कीटक तसेच उंदीर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांचा अभाव असल्याचे FDAने नमूद केले आहे.

फळ-भाज्यांवर झुरळांचा प्रादुर्भाव

तपासणीदरम्यान फळे आणि भाज्यांच्या साठ्यावर मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे अन्नपदार्थ दूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

कोल्ड रूममध्ये मुदतबाह्य आणि खराब झालेल्या पॅकेज्ड अन्नपदार्थांचा साठा आढळल्यानेही FDAने गंभीर आक्षेप नोंदवला आहे.

याशिवाय कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि देखभालीमध्येही अनेक त्रुटी आढळल्या. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यासंबंधी आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचेही तपासणीत समोर आले.

Blinkitचा अन्न परवाना निलंबित

या सर्व गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर Blink Commerce Pvt. Ltd.चा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.

परवाना निलंबित असताना संबंधित आस्थापनातून कोणत्याही प्रकारची अन्नपदार्थांची विक्री, वितरण किंवा अन्न व्यवसाय सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

परवाना निलंबित असतानाही व्यवसाय सुरू असल्याचे पुढील तपासणीत आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा FDAकडून देण्यात आला आहे.

FDAच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 आणि संबंधित नियमांनुसार करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe’s FDA in action mode.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात