विशेष प्रतिनिधी
पालघर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर येथे ‘सेवा संकल्प अभियान 2026’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. Devendra Fadnavis
‘तत्कालीन अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य’
एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारामुळे विद्यार्थी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘ज्यावेळी पेपरफुटीची घटना घडली, त्यावेळी विवेक भीमनवार हे पदावर रुजू देखील झाले नव्हते. घटनेनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे मागच्या काळातील घडामोडींसाठी सध्याच्या अध्यक्षांचा थेट राजीनामा कसा मागता येईल?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
न्यायालयीन चौकशीची तयारी आणि कलम ३१७ चा उल्लेख
शासनाची भूमिका मांडताना फडणवीस पुढे म्हणाले, ‘आम्ही याप्रकरणाची न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करण्यास तयार आहोत. या चौकशीत सध्याचे अध्यक्ष असोत, जुने अधिकारी असोत की अन्य कोणी, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून राष्ट्रपतींना आहे. चौकशी समितीनं अहवाल दिल्यास आणि दोष सिद्ध झाल्यास, भारतीय संविधानाच्या कलम ३१७ अन्वये त्यांना हटवण्याची शिफारस आम्ही राष्ट्रपतींकडे करू.’
विद्यार्थ्यांचे आंदोलन आता पूर्णपणे राजकीय
चालू असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केला. ‘हे आंदोलन सुरुवातीला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे होते, परंतु आता ते पूर्णपणे राजकीय झाले असून एखाद्या ‘इव्हेंट’सारखे चालवले जात आहे,’ असे ते म्हणाले.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केले की, ‘माननीय उच्च न्यायालयाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवले असून तिथून उठण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाचा अवमान करून आंदोलक तिथे बसले आहेत. तरीही आमचे सरकार चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App