‘पक्ष सोडणार असल्याच्या बातमीने धक्का’; गजानन कीर्तिकरांनी नाराजीच्या चर्चांना लावला पूर्णविराम

Gajanan Kirtikar

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास; शिवसेनेला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपण शिवसेना सोडणार असल्याच्या बातम्या निराधार असून पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करत माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षातील नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण समाधानाने काम करत असून शिवसेनेला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कीर्तिकर नाराज असल्याच्या आणि ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कीर्तिकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्ष सोडण्याच्या बातम्या पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगत त्यांनी या वृत्तांचे खंडन केले.

“मी शिवसेना पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांमुळे मला आश्चर्याचा धक्का बसला. पक्ष सोडण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी समाधानाने काम करत आहे. अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा इरादा नाही,” असे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी फोन करून विचारपूस केली असून त्यांच्याशी बोलताना आपण वस्तुस्थिती सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना शिवसेना सध्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्याची मागणी

पक्ष सोडण्याची कोणतीही ऑफर आपल्याला आलेली नसल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षातील कार्यकर्त्यांशी नियमित संपर्क असणे आवश्यक असल्याचे त्यांनी शिंदे यांना सांगितले. माजी खासदार म्हणून आजारी व्यक्ती, अन्यायग्रस्त नागरिक आणि गरजू लोकांची कामे करण्यासाठी संपर्क महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

तातडीच्या कामांसाठी मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुखांशी संपर्क साधता आला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संपर्कातील अडचणी दूर करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले. तसेच, महिन्यातून किमान एक बैठक आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक म्हणून काम करतानाच पक्षासाठीही पुरेसा वेळ द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

ठाकरे गट सोडण्यामागचे कारणही सांगितले

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काँग्रेसधार्जिणी होत होती आणि पक्षाचा मराठी बाणा हरवत होता, असे वाटल्याने आपण तो पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरणही कीर्तिकर यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांच्याशी भेट होत नसल्याने आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने कीर्तिकर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे ते पुन्हा ठाकरे गटात परतण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, या सर्व बातम्या निराधार असल्याचे सांगत कीर्तिकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आहेत. ठाकरे गटाचे मुंबईतील नेते अमोल कीर्तिकर यांचे ते वडील आहेत. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Gajanan Kirtikar puts an end to speculations about his displeasure.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात