विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पुणे दौऱ्यानंतर आता अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात त्यांचे दोन महत्त्वाचे कार्यक्रम होणार असून, त्यासोबतच राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राजकीय चर्चा आणि आढावा बैठकाही होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केल्याने हा दौरा चांगलाच चर्चेत आला होता. आता पुण्यानंतर मुंबई दौऱ्यात अमित शहा कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या हस्ते नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
सहकार क्षेत्राला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या संस्थेच्या नवीन कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानंतर अमित शहा मुंबई शेअर बाजाराच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून अमित शहा सहकार, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.
मुंबई दौऱ्यात अमित शहा राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. मुंबई विभागीय भाजप तसेच प्रदेश भाजपच्या नेत्यांशीही ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे अमित शहा यांच्या या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यात सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील कार्यक्रमांसोबतच महाराष्ट्रातील आगामी राजकीय घडामोडींवरही खलबतं होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App