नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टाकलेला डाव आणि विलीनीकरणाची खेळी याचा दबाव याचा उलटाच परिणाम झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपशी जरा जास्तच जवळीक वाढली. याचा प्रत्यय आजच्या राजकीय घडामोडीतून आला.The pressure of the merger move has the opposite effect; Ajit’s NCP is closer to the BJP!!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. अजित पवारांच्या विमाना अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन त्यांना सादर केले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाला दिले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांना दिली.
– रोहित पवारांच्या मागणीला छेद
अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताविषयी रोहित पवारांनी संभ्रम आणि संशयाची पेरणी केल्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण वेगळेच तयार झाले. रोहित पवारांनी केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या सरकारी तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवून अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय खाजगी गुप्तहेर संस्थांकडे सोपविला. खासगी गुप्तहेर संस्थांनी तपास सुद्धा सुरू केला. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेऊन थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेऊन विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी करून सरकारी यंत्रणांवर विश्वास दर्शविला. तसे करून सुनेत्रा पवारांनी रोहित पवारांच्या संशय पेरणीला छेद दिला. त्यामुळे रोहित पवारांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेतली हवा आजच काढून घेतली गेली.
– जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र
पण त्यापलीकडे जाऊन सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची राजकीय जवळीक वाढली. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ यांच्या भेटीनंतर काहीच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुनील तटकरे यांच्या भेटीला पोहोचले. तिथे दोन्ही नेत्यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालांवर चर्चा केली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना यांनी एकत्रितपणे सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये कशाप्रकारे सत्ता स्थापन करायची, याविषयी विचार विनिमय केला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्षाचे जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढले होते. काही ठिकाणी फक्त दोन पक्षांची आघाडी होती, तर बहुसंख्य ठिकाणी स्वतंत्रच लढत झाली, पण निवडणूक संपली, आता सत्ता मात्र एकत्र येऊन स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊनच रवींद्र चव्हाण सुनील तटकरे यांना भेटले. सुनील तटकरे यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण आणि भाजप यांच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची राजकीय जवळीक अगदी जिल्हा परिषद स्तरापर्यंत येऊन ठेपली.
– शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तोटा
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलीनीकरणाचा मुद्दा काढून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर “कब्जा” करायचा “डाव” खेळला, पण त्याचा उलटाच परिणाम झाला. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री शपथविधी झाला. त्या पाठोपाठ त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या पलीकडे जाऊन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची राजकीय जवळीक जिल्हा परिषद स्तरापर्यंत येऊन ठेपली. या सगळ्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मात्र राजकीय तोटा झाला. फार मोठ्या खेळ्या करून त्यांच्या हाताला बातम्यांच्या फुग्यांशिवाय काहीच लागले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App