विशेष प्रतिनिधी
अभिजीत दिपके यांच्यावर ठेवण्यात येत असलेल्या पाळतीबाबत आणि पोलिसांसोबत झालेल्या वादाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “अभिजीत दिपके ज्या आंदोलनातून पुढे आले आहेत, त्या आंदोलनाकडे आता यंत्रणेचे लक्ष आहे. देशातली एक सिस्टीम अशा प्रकारची पाळत अनेक पक्षांवर ठेवते. राजकारणात हे सगळं सहन करावं लागतं. आमच्यावरही पाळत ठेवली गेली; त्यामुळे आमचे काम थांबले का?”
“अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील. सरकार पावलोपावली विरोध करेल, अडथळे निर्माण करेल आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचाही प्रयत्न होईल. आमच्यावरही गुन्हे दाखल झाले आणि आम्ही तुरुंगात गेलो. संघर्ष करताना या गोष्टी सहन कराव्या लागतात. तरच आपण जमिनीवर टिकून राहू शकतो. हा माझा त्याला प्रेमाचा सल्ला आहे. तो मुलगा लहान आहे,” असे राऊत यांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी झारखंडमधील नेहा बोरा प्रकरणाचाही उल्लेख केला. “झारखंडमध्ये नेहा बोरावर शाई फेकण्यात आली. तिचे करिअर बघा, तिचा चेहरा बघा. या वयात ही मुले देशाचे नेतृत्व करत आहेत,” असे राऊत म्हणाले.
“तिच्या अंगावर आणि चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. मात्र तिने त्यावर प्रतिक्रिया देताना शाई तोंडावर फेकण्यासाठी नसते, तर लिहिण्यासाठी असते, असे सांगितले. या शाईतून क्रांतीची गीते लिहिली जातात,” असेही राऊत यांनी म्हटले.
छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी आणि परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मात्र, दिपके यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून उद्धट वागणूक दिली जात होती. यावरून ते पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले. “मी कोणाला भेटायचे आणि कोणाला भेटायचे नाही, हे मी ठरवणार. पोलिसांनी मला हे सांगायचे नाही,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्याची ओळख आणि पदाबाबतही सवाल करत पोलिसांना आपल्या घराच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या एका कार्यक्रमात एआय टूलच्या सादरीकरणासाठी आपली वैयक्तिक माहिती उघड करण्यात आल्याचा आरोपही अभिजीत दिपके यांनी केला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांसमोर आपली वैयक्तिक माहिती उघड करण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अमेरिकन कंपन्यांच्या माध्यमातून सरकार आपल्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का, असाही प्रश्न दिपके यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App