विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी, “उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदेच दिसतात,” अशी बोचरी टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला कदम यांनी प्रत्युत्तर दिले. “शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती. मग त्यावेळी पंतप्रधान तुमचे बॉस झाले होते का?” असा सवाल कदम यांनी केला.
राज्याचा उपमुख्यमंत्री विकासकामांच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटू शकतो, असे सांगत कदम म्हणाले, “तुम्ही आम्हाला गद्दार म्हणत राहा. तुमचा पक्ष संपत चालला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदार-खासदारांची संख्या वाढत आहे. तुम्ही टीका करत बसा, आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ.”
विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांची भेट घेतल्याचा उल्लेखही कदम यांनी केला. “मग फडणवीस आणि इतर नेते आदित्य ठाकरे यांचे बॉस झाले का?” असा सवाल त्यांनी केला.
“दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवावे. उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केवळ द्वेष आहे. उद्धव ठाकरेंनी आपण बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहोत, याची जाणीव ठेवावी,” असे ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षांवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केल्यानंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. “उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर रडले. ‘रुदाली’ चित्रपटात ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासाठी असतात, त्याच पद्धतीने त्यांची अवस्था झाली आहे,” अशी टीका म्हस्के यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App