विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न झाली. या परिषदेने तीन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर केले. यामध्ये ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘एकसंघ भारताचा संकल्प’ आणि ‘नक्षलमुक्त भारत अभियान’ या ठरावांचा समावेश आहे. हे ठराव सामाजिक समता, संविधान संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ देणारे आहेत. परिषदेला उपस्थित असलेल्या राज्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरत या ठरावांना जाहीर मंजुरी दिली.Social Justice Conference in Mahad; condemnation of tendencies that create discord regarding reservation and the Constitution!!
– मंजूर केलेले ठराव :
– ‘एक गाव – एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रहातून मानवी समतेचा संदेश दिला. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी मोठे कार्य केले. या दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत हा मुख्य ठराव मांडण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये पाणवठा, मंदिरे आणि स्मशानभूमीवर सर्व समाजघटकांना समान प्रवेश मिळाला पाहिजे. जातीच्या आधारावर होणारा कोणताही भेदभाव मोडून काढला पाहिजे. ‘एक गाव – एक पाणवठा, एक मंदिर आणि एक स्मशानभूमी’ ही संकल्पना आता प्रत्यक्ष कृतीत आणली जावी, असा ठराव परिषदेत मंजूर करण्यात आला.
– एकसंघ भारताचा संकल्प आणि अपप्रवृत्तींचा निषेध
आरक्षण आणि संविधानाबाबत सध्या समाजात जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे. यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघटनवादी प्रवृत्तींचा या परिषदेत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तर डॉ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य व बंधुतेचा मार्ग दिला. याच संविधानाच्या मूल्यांवर आधारित एकसंघ भारत निर्माण करण्याचा दृढ संकल्प या ठरावाद्वारे करण्यात आला.
– नक्षलमुक्त भारत अभियानाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन
देशातील हिंसक नक्षलवाद आणि माओवादी चळवळींमुळे राष्ट्रविकासाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, देशात शांतता व सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘नक्षलमुक्त भारत अभियान’ प्रभावीपणे राबवले. या अभियानाबद्दल परिषदेत केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. हिंसेचा मार्ग नाकारून लोकशाही, संविधान आणि शांततामय मार्गानेच पुढे जाण्याचा निर्धार सर्व प्रतिनिधींनी या वेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App