विशेष प्रतिनिधी
नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील तख्त श्री हजूर साहिब परिसरातील माता साहिब गुरुद्वाराजवळ जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सुखबीर सिंह बादल हे पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात दर्शनासाठी आले होते. यावेळी एका निहंगाने कृपाणाने बादल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत हल्लेखोराला बाजूला केले. त्यानंतर बादल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराची ओळख ६२ वर्षीय जसपाल सिंह अशी झाली आहे. तो गेल्या काही काळापासून गुरुद्वारा परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच हल्लेखोर बादल यांच्या इतक्या जवळपर्यंत कसा पोहोचला, सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या का आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासह सर्व बाबींचा तपास करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारातील एका सेवादाराने बादल यांच्यावर हल्ला केला. यावेळी पोलीस दलातील पीएसआयने तातडीने हस्तक्षेप करून बादल यांचा बचाव केला. या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेतील त्रुटींचाही तपास केला जात आहे. हल्ल्यामागे कोणतेही मोठे षडयंत्र आहे का, याचीही चौकशी होणार आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखबीर सिंह बादल यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बादल यांच्याशी संपर्क साधला. हल्लेखोराला कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घातले जाणार नाही आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नांदेडमधील या घटनेमुळे गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तपासातून हल्ल्यामागचे नेमके कारण काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App