विशेष प्रतिनिधी
सोलापूर : अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवल्याच्या कथित प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित श्रीशैल हुळळी याला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे. सदर बाजार पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. MLA Kalyanshetti
या प्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे खासगी वाहनचालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरवसे यांच्या तक्रारीनुसार, दोन संशयितांनी त्यांना आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यास सांगत पैशांचे आमिष दाखवले होते.
तक्रारीनंतर पोलिसांनी प्रभाकर हनुमंत फुलारी आणि श्रीशैल हुळळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. प्रभाकर फुलारी याला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरा संशयित श्रीशैल हुळळी फरार होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू होता. अखेर पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागला आणि कोल्हापुरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून या कथित कटामागे नेमके कोण आहे, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
सचिन कल्याणशेट्टी हे कुटुंबासोबत सोलापुरात खरेदीसाठी आले असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. त्यावेळी त्यांचे चालक आनंद सुरवसे हे वाहनाजवळ थांबले होते. याचदरम्यान दोन व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला.
या दोघांनी सुरवसे यांना आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर गोळीबार करण्यास सांगितले आणि त्यासाठी पैशांचे आमिष दाखवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, सुरवसे यांनी या कथित ऑफरला स्पष्ट नकार दिला. त्यांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारण्याचाही प्रयत्न केला. मात्र, प्रकार उघड होण्याची शक्यता लक्षात येताच दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चालकाने दिली वरिष्ठांना माहिती
घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर आनंद सुरवसे यांनी याबाबत आमदार कल्याणशेट्टी यांचे पीए आणि त्यांच्या भावाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ सदर बाजार पोलिस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता श्रीशैल हुळळीच्या पोलिस कोठडीतील चौकशीतून या कथित प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App