नार्वेकरांचा निर्णय खरंच टिकणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान म्हणाले, “मला पूर्ण खात्री…”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयाबाबत मोठा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देश आणि निकषांच्या चौकटीत राहूनच आपण निर्णय घेतला असून, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे टिकून राहील, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“पीठासीन अधिकारी म्हणून अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे. निर्णय घेताना कायद्याच्या सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले आहे. ‘डिसक्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑन ग्राउंड्स रूल्स, 1986’ तसेच संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचे पालन करण्यात आले आहे,” असे नार्वेकर यांनी सांगितले.



“सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देश आणि निकषांच्या चौकटीत राहूनच मी निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझा निर्णय अत्यंत शाश्वत असून तो न्यायालयात निश्चितपणे टिकून राहील, याची मला पूर्ण खात्री आहे,” असा दावा त्यांनी केला.

आपण आपले काम अत्यंत चोखपणे केले असून, या निर्णयात कोणतीही कायदेशीर त्रुटी आढळू नये, अशी अपेक्षाही नार्वेकर यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालय हे देशातील अंतिम न्यायालय आहे. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय जो काही असेल, तो सन्मानाने स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कपिल सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एकनाथ शिंदे गटातील 39 आमदार अपात्र ठरल्यास निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याचा निर्णयच अडचणीत येऊ शकतो, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

तसेच, पक्षाने कारवाईची मागणी करूनही विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. आमदारांना नोटिसा देऊन प्रकरण लांबवण्यात आल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यांवरूनही नार्वेकरांचा टोला

दरम्यान, राज्यातील दौरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल नार्वेकर यांनी टोला लगावला. “नेत्यांचे कामच लोकांसाठी फिरणे आहे. आपण फिरून जनतेवर कोणतेही उपकार करत नाही. लोकप्रतिनिधी फिरत असतील तर ते त्यांचे काम आहे आणि त्यांनी ते केलेच पाहिजे,” असे नार्वेकर म्हणाले.

“मीदेखील माझ्या परिसरातील नागरिकांना पाणी आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या जबाबदारीतून फिरत आहे,” असे सांगत नार्वेकर यांनी आपल्या दौऱ्यांचे समर्थन केले.

My Decision Is Legally Sound, Will Stand in Supreme Court: Rahul Narwekar on Shiv Sena Dispute

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात