विशेष प्रतिनिधी
पुणे: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य तटकरे यांनी केले होते. याच विधानाचा संदर्भ देत, इतके दिवस या प्रकरणाच्या तपासाबाबत नेमके काय केले आणि आतापर्यंत झोपा काढत होतात का, असा खोचक सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग, मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि पंतप्रधान मोदींच्या विधानांवरही भाष्य केले.Harshwardhan Sapkal
निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि मोदींच्या सल्ल्यावरून टीका
निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत जनतेच्या मनात संभ्रम असल्याचे सांगितले. सध्या निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी असल्यासारखी स्थिती असताना काही लोक आयोगाच्या कारभारावर प्रश्न विचारण्याऐवजी त्याची बाजू घेत असल्याची टीका त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना निवडणूक आयुक्तांची भेट मिळाल्याच्या मुद्द्यावर टोला लगावताना सपकाळ म्हणाले की, राजू शेट्टींचे नशीब चांगले की ते एकटे गेले आणि त्यांना भेट मिळाली, मात्र आम्ही 300 खासदारांना सोबत घेऊन गेलो तरी निवडणूक आयुक्त भेटत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तसेच, वर्षभरापूर्वी सोने खरेदी करू नये असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी परदेश दौरे न करण्याचे आणि भाज्यांमध्ये तेलाचा वापर कमी करण्याचेही आवाहन केले होते; मात्र स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्यक्रमांत त्यांनी काय केले, असा सवाल करत सर्वसामान्यांना सल्ले देण्याऐवजी स्वतःच्या कृतीतून उदाहरण घालून देण्याचा टोला सपकाळ यांनी लगावला.Harshwardhan Sapkal
डिलिमिटेशनला विरोध कायम; रोहित पवारांच्या प्रवेशावर सावध भूमिका
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर बोलताना, या विधेयकाच्या माध्यमातून भाजपला देशात पुन्हा जातीय तेढ निर्माण करायची असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या विधेयकाला ‘इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्षांचा विरोध असून यावर आघाडीच्या पातळीवर सविस्तर चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजपसोबत जाणार नसून खासदार सुप्रिया सुळे सध्या केवळ विधेयकासंदर्भात आपली भूमिका मांडत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर विचारले असता सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली; राष्ट्रवादी काँग्रेस हा मित्रपक्ष असून आम्ही रोहित पवार यांच्या कामाचे कौतुक करतो, मात्र त्यांच्या पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App