विशेष प्रतिनिधी
जालना : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आणि फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या कर्जवसुलीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून सत्ताधारीच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. संकट कितीही मोठे असले तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन करत फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी वसुलीला आल्यावर घाबरून न जाता त्यांना स्पष्टपणे ‘पैसे नाहीत’ असे सांगावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
फायनान्स कंपन्यांच्या दमदाटीविरुद्ध गावकऱ्यांनी एकजूट दाखवावी
फायनान्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कर्जाच्या वसुलीसाठी गावागावांत जाणारे प्रतिनिधी शेतकऱ्यांना अपमानास्पद भाषा वापरून धमकावत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांवर मानसिक दबाव वाढत आहे. केवळ भाषणांमधून शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असे सांगून उपयोग नाही, तर सरकारने या प्रकारांना प्रत्यक्ष आळा घातला पाहिजे. जर कोणी कर्जवसुलीच्या नावाखाली दडपशाही किंवा दमदाटी करत असेल, तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन कायदेशीर मार्गाने विरोध करावा आणि गरज पडल्यास अशा प्रतिनिधींना गावात येण्यास मज्जाव करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिवाळी अधिवेशनातील सरकारच्या प्राधान्यक्रमावर उपरोधिक टीका
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी सरकारच्या कामकाजावर उपरोधिक टीका केली. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता संकटात असताना मंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून सभागृहात नवीन पडदे बसवले जात आहेत, पण या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल अशी अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले. राजकीय नेते एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे दाखवतात, पण पडद्यामागे ते एकत्र असतात; त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी एकमेकांवर दगडफेक करण्यापेक्षा स्वतःच्या प्रश्नांसाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार अपघात प्रकरण, 500 कोटींचा रेकॉर्डिंग बॉम्ब आणि स्वतःविरोधातील मोहिमेवर भाष्य
या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरही आपली मते मांडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना ते म्हणाले की, या घटनेत आपला माणूस गेला असून ही अत्यंत दुःखद वस्तुस्थिती आहे; कुटुंबीयांची मागणी असेल तर या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, मात्र निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. तसेच, 500 कोटींच्या कथित रेकॉर्डिंग बॉम्ब प्रकरणात अनेक लोक भाजपशी संबंधित असल्याने केवळ एसआयटी आणि समित्या नेमून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, सध्या आपल्याविरोधात बोलण्यासाठी काही लोकांना पैसे दिले जात असून ‘माझ्याविरोधात बोला आणि पैसे कमवा’ असे अभियानच सुरू असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App