विशेष प्रतिनिधी
मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातास कारणीभूत असलेल्या व्हीएसआर (VSR) कंपनीच्या मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. फडणवीस यांचा व्हीएसआर कंपनीचे रोहित सिंग यांच्यासोबतचा फोटो दाखवत तेच ‘मफलर मॅन’ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रवक्ते नवनाथ बन आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हणत रोहित पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
रोहित पवारांना वेड्याच्या रुग्णालयात पाठवायला हवे, त्यांचीच चौकशी करा: प्रवीण दरेकर
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी रोहित पवार यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, रोहित पवारांना प्रसिद्धीच्या हव्यासाची मस्ती एवढी डोक्यात जाईल असे आम्हाला वाटले नव्हते. ते शरद पवारांचे नातू आहेत, पण त्यांची सुसंस्कृत राजकीय परंपरा मातीत घालण्याचे काम करत आहेत. अमाप प्रसिद्धी मिळावी म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करत असून त्यांना वेड्याच्या रुग्णालयात पाठवायला हवे, म्हणजे त्यांची मानसिक परिस्थिती स्पष्ट होईल. व्हीएसआर कंपनी 2013 पासून अनेक नेत्यांना विमानसेवा देत असते, त्यातील केवळ एक फोटो दाखवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नीच आरोप करणे चुकीचे आहे. आरोप करायला अक्कल लागत नाही, आज त्यांचा भ्रम आणि भोपळा फुटला आहे. अजितदादा हे राज्याचे अत्यंत महत्त्वाचे नेते होते, त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी रोहित पवारांनाच इंट्रोगेशनसाठी बोलावले पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अजित पवारांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून नीच राजकारण: नवनाथ बन
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनीही या प्रकरणावरून रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धारेवर धरले. नवनाथ बन म्हणाले की, रोहित पवार हे प्रसिद्धीसाठी हापापलेले नेते आहेत. आज दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा महत्त्वाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून रोहित पवार यांनी अतिशय नीच पातळीचे राजकारण केले आहे. व्हीएसआर कंपनी आणि रोहित सिंग 2013 पासून राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांना आणि सरकारला विमानसेवा पुरवत आहेत. केवळ एका फोटोवरून मुख्यमंत्र्यांवर असे गंभीर आरोप करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरा पायदळी तुडवण्याचे काम आज झाले आहे. शरद पवार साहेब आणि त्यांच्या पक्षाचे नेते रोहित पवार यांच्या या आरोपांशी सहमत आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असा सवालही नवनाथ बन यांनी उपस्थित केला.
डोंगर पोखरून उंदीर काढला, राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी दादांच्या मृत्यूचा वापर: गोपीचंद पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवत म्हटले की, रोहित पवारांनी आज डोंगर पोखरून उंदीर काढला आहे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूचा वापर केला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रक्रियेत आपल्याला मंत्रिपद मिळणार नाही हे रोहित पवारांना चांगलेच माहीत आहे; त्यामुळेच भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांविरोधात बोलून स्वतःच्या पदरात किमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पाडून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला. जर त्यांच्याकडे खरोखरच इतके पुरावे असतील, तर त्यांनी ते उगाच आरोप करत बसण्याऐवजी उचित तपास यंत्रणेकडे सुपूर्द करावेत; अजितदादांच्या प्रकरणाची काळजी केवळ रोहित पवारांनाच नाही, तर दादांच्या संपूर्ण कुटुंबालाही आहेच, असेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App