गडचिरोली : सशस्त्र माओवादापेक्षाही दिमागी माओवाद अधिक धोकादायक आहे. कारण देशाच्या संविधानाला नाकारणारी आणि देशाची व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या विचारांची पिढी तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. गडचिरोलीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. Chief Minister Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 14 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत मुक्कामी दाखल झाले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा त्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला आहे. यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि 6 जून 2025 रोजी 13 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यानंतर ते गडचिरोलीत मुक्कामी राहिले होते. यावेळी त्यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या रेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला.
दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री नागपूरहून गडचिरोलीत दाखल झाले. यावेळी त्यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या मैदानावर राज्यभरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत संवाद साधला.
यावेळी माओवादाच्या आव्हानावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सशस्त्र माओवादापेक्षाही दिमागी माओवाद अधिक खतरनाक आहे. कारण देशाच्या संविधानाला नाकारणारी पिढी तयार करणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. देशाच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा विचारांची पिढी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
त्यामुळे या विचारसरणीशी लढताना संविधानाच्या चौकटीत राहूनच लढा द्यावा लागेल. देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून कसा न्याय मिळू शकतो, हे प्रभावीपणे पटवून द्यावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या 151व्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिन साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
एकेकाळी नक्षलवादामुळे संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत आता देशस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आदिवासी समाजाचा शौर्य, त्याग आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा देशासमोर मांडण्यासाठी गडचिरोली सज्ज झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App