विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : एक काळ असा होता, जेव्हा भारतातील अनेक दिवस आणि सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जात होते. मात्र, आज भारत स्वदेशी आत्मसन्मानाने आपला वारसा, इतिहास आणि महानायकांचे स्मरण करत आहे. जनजातीय गौरव दिनाचा उत्सव आता राष्ट्रीय उत्सव बनला आहे. हा आपल्या राष्ट्रीय चेतनेतील मोठ्या बदलाचा प्रतीक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी पीएम जनमन योजना आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या दोन योजनांसाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक बजेटची तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या 151व्या जयंतीनिमित्त रविवारी (15 नोव्हेंबर) गडचिरोली येथे देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी देशभरातील आदिवासी समाजाला जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा देत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 15 नोव्हेंबर 2021 रोजी जनजातीय गौरव दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. आज या उत्सवाने राष्ट्रीय स्वरूप प्राप्त केले आहे. गेल्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात दोन लाखांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कोट्यवधी नागरिकांनी सहभाग घेतला होता.
पूर्वी देशातील अनेक महत्त्वाचे दिवस आणि सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जात होते. मात्र, आज भारत आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि महानायकांचा स्वदेशी आत्मसन्मानाने गौरव करत आहे. हा देशाच्या राष्ट्रीय चेतनेत झालेल्या मोठ्या परिवर्तनाचा पुरावा आहे. जनजातीय गौरव दिन हा केवळ आदिवासी समाजाचा उत्सव नसून संपूर्ण देशाच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे, असेही मोदी म्हणाले.
आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. देशातील अनेक आदिवासी भाग स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित होते. या भागांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
पीएम जनमन योजना आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या दोन महत्त्वाच्या योजनांसाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक बजेटची तरतूद करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांपर्यंत स्वातंत्र्यानंतर सर्वात उशिरा विकासाच्या सुविधा पोहोचल्या, त्यांच्यापर्यंत आता या सुविधा सर्वात जलद गतीने पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून देशभरात आदिवासी विकासाशी संबंधित 246 प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे 3 हजार कोटी रुपये आहे. यामध्ये 170 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण, तर 70 हून अधिक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.
यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा, पीएम जनमन योजनेंतर्गत बहुउद्देशीय केंद्रे, आरोग्य सुविधा, आदिवासी उत्पादनांच्या विक्रीसाठी विपणन केंद्रे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
मिझोराममध्ये स्वातंत्र्यसैनिक रोपुइलियानी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या आदिवासी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये आदिवासी संशोधन संस्थेच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने मोठे योगदान दिले आहे. अन्याय आणि ब्रिटिशांच्या अत्याचाराविरोधात आदिवासी समाजाने नेहमीच संघर्ष केला. भगवान बिरसा मुंडा यांच्यासह तिरोत सिंग, सिधो-कान्हू, गोविंद गुरू, राणी गाईदिन्ल्यू, तंट्या भिल्ल, अल्लुरी सीताराम राजू आणि राणी दुर्गावती यांसारख्या महानायकांचे योगदान देशासाठी प्रेरणादायी आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी तरुण वयात केलेला संघर्ष आणि त्यांचे उलगुलान आजही कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास देशासमोर आणणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
देशातील दोन मोठ्या उपलब्धींचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 50 कोटी नागरिक भीषण गरिबीतून बाहेर आल्याचा दावा केला. तसेच देश नक्षलवाद आणि माओवादी दहशतीच्या संकटातून मुक्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
नक्षलवादी हिंसाचाराचा सर्वाधिक फटका आदिवासी समाजाला बसला. 2014 मध्ये देशातील सुमारे 125 जिल्हे माओवाद आणि नक्षलवादाने प्रभावित होते. या हिंसाचारात हजारो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. आदिवासी नागरिकांचे अधिकार हिरावून घेतले जात होते. अनेकांना मतदान करण्यापासूनही रोखले जात होते, असे मोदी म्हणाले.
मात्र, आज नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आदिवासी समाजातील माता-भगिनींना सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. गडचिरोलीसह नक्षलग्रस्त राहिलेल्या भागांमध्ये आता आशेचा नवा प्रकाश पोहोचत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा घेऊन विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. दरवर्षी 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिन अधिक उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. या दिवशी नवीन संकल्प करून ते ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांत जे साध्य झाले नाही, ते आपण कमी कालावधीत साध्य केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App