विशेष प्रतिनिधी
बारामती : वीजबिलांची थकबाकी भरता न आल्याने कायमस्वरूपी वीजजोडणी तोडली गेलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा दिला आहे. थकबाकीच्या ओझ्याखाली दबलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी घेण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ केला जाणार आहे. एवढेच नव्हे, तर मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यामध्येही २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. महावितरणने ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली असून, ६ नोव्हेंबरपासून १५ जानेवारी २०२७ पर्यंत ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळविण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांना एकरकमी रक्कम भरण्याबरोबरच हप्त्यांचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे, अशा घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि अन्य बिगरशेती ग्राहकांना पात्र ठरविण्यात आले आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, कृषी ग्राहक आणि सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनांना यातून वगळण्यात आले आहे.
योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना अर्ली बर्ड रिबेट मिळणार आहे. तीन वर्षांपर्यंत वीजजोडणी खंडित असलेल्या लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जोडणी खंडित असलेल्यांना २० टक्के सवलत मिळेल. इतर लघुदाब आणि उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. एकरकमी पैसे भरणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठीही महावितरणने पर्याय ठेवला आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम भरून उर्वरित थकबाकी सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येईल. उच्चदाब ग्राहकांना तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा असेल. याशिवाय २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीवेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारल्यास मूळ थकबाकीत आणखी पाच टक्के सवलत मिळणार आहे. पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्कही माफ करण्यात येणार आहे.
७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी….
महावितरणच्या आकडेवारीनुसार, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ३४ लाख ८६ हजार ग्राहकांकडे तब्बल ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. तर तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या आणखी २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी असून, त्यातील १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज माफ केले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे थकबाकीमुळे अंधारात असलेल्या ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी घेण्याची आणि आर्थिक बोजा कमी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App