विशेष प्रतिनिधी
नाशिक : सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या राजकीय विलीनीकरणाच्या चर्चेवर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अत्यंत सूचक आणि भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या आयुष्यात मला दोनच नेते आणि मार्गदर्शक लाभले, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. त्यामुळे दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जुन्या लोकांना आनंदच होईल,” असे विधान करत भुजबळांनी राजकीय वर्तुळात नवी गुगली टाकली आहे. Chhagan Bhujbal
‘मर्जरचा खेळ सुरू आहे, पण तुटून निर्णय नको’
भुजबळ म्हणाले, सध्या विलीनीकरणाचा खेळ सुरू आहे. पण जर व्हायचेच असेल, तर दोन्ही बाजूंनी खेळले पाहिजे. क्रिकेटच्या मॅचसारखे सर्वांनी एकत्र येऊन गळ्यात हात घालून एकत्रितपणे निर्णय घेतला पाहिजे. तुटत-तुटत कोणी असे काही करावे असे मला वाटत नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, कोण कोणाला भेटायला जातेय हे केवळ टीव्हीवरूनच समजत असून, पक्षांतर्गत अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही.
‘सगळे एनडीएमध्ये येणार की जाणार?’ – भुजबळांचा सर्वात मोठा सवाल
दोन्ही गट एकत्र येण्याबाबत भुजबळांनी एक अत्यंत महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. “मी जेव्हा विचार करतो की हे कसे काय जमणार आहे? सगळे NDA मध्ये येणार आहेत काय? नक्की काय आहे, याचा अजून शोध लागलेला नाही,” असे भुजबळ म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी म्हटल्याप्रमाणे योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
‘माझ्या आयुष्यात फक्त दोनच नेते: बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार’
शरद पवारांच्या भेटीबाबत बोलताना भुजबळ भावूक झाले. ते म्हणाले, “पवार साहेबांना भेटायला मी पण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जाणे यात काहीही चूक नाही. माझ्या आयुष्यात माझे दोनच नेते आणि मार्गदर्शक आहेत. एक बाळासाहेब ठाकरे, जे आज दुर्दैवाने हयात नाहीत, आणि दुसरे शरद पवार साहेब. पवार साहेबांचा आणि माझा पक्ष वेगळा असला तरी आमचे संबंध चांगले आहेत. राजकारणात कितीही मोठा दुश्मन असला तरी साहेब प्रत्येकाशी प्रेमाने बोलतात, हा गुण आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत.”
‘राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी फक्त आम्ही दोघेच होतो; दोन्ही पवार एकत्र आल्यास आनंदच!’
विलीनीकरणाबाबत स्वतःची भूमिका मांडताना भुजबळांनी थेट इतिहासाचा दाखला दिला. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन करताना मुळात आम्ही दोघेच होतो, एक पवार साहेब आणि एक छगन भुजबळ. बाकीचे लोक तर चार महिने आलेच नव्हते. त्यामुळे जर उद्या दोन पवार एकत्र आले, तर ज्यांनी राष्ट्रवादी मोठी केली, त्या जुन्या-जाणत्या लोकांना आनंद होणे स्वाभाविकच आहे. तसेच उद्या दोन्ही शिवसेना (ठाकरे-शिंदे) एकत्र आल्या, तर जुन्या शिवसैनिकांनाही नक्कीच आनंद होईल.”
मात्र, स्वतःच्या सद्यस्थितीबाबत बोलताना भुजबळ यांनी स्पष्ट केले की, सध्या माझा पक्ष वेगळा आहे आणि माझ्या पक्षाचे जे काही नेते, आमदार आणि जिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्यासोबत राहणे मला क्रमप्राप्त आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App