सतेज पाटलांविरोधात चंद्रकांत पाटलांचा एल्गार; मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशाची प्रतीक्षा, पाच मिनिटांत सगळं संपवण्याचा दावा!

chandrakant-patil

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून पेटलेल्या राजकारणाचे पडसाद आता संपूर्ण राज्य पातळीवर उमटू लागले आहेत. एका प्रमुख न्यूज वाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी आपल्या जुन्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत, “मुख्यमंत्र्यांनी मला फक्त आदेश द्यावेत, सतेज पाटलांचे साम्राज्य पाच मिनिटांत उद्ध्वस्त करतो,” या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. यासोबतच, सतेज पाटील यांना कायद्याच्या चौकटीतच वेसण घालणार असून, खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या मनमानी फी-वसुली विरोधात लवकरच कडक कायदा आणणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

गोकुळ दूध संघ निवडणूक ते थेट राजकीय संघर्ष

गोकुळ दूध संघाची निवडणूक आणि त्यानंतर पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान सतेज पाटील आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अत्यंत तीव्र शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. या काळात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जहरी टीका करण्यात आली. अखेर गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचा संचालक विराजमान झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर थेट हल्लाबोल केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी कायद्याचा बडगा उगारण्याचा आणि शिक्षण संस्थांच्या चौकशीचा इशारा दिल्याने कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला आणि शिक्षण संस्थांची चौकशी

न्यूज वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील आक्रमकपणे म्हणाले, “गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कोणीही वाकडे बोललेले मी सहन करणार नाही. म्हणूनच मी सतेज पाटलांना उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. वास्तविक पाहता मी वैयक्तिक सूडबुद्धीने काहीही केलेले नाही; तर सर्वोच्च न्यायालयानेच खासगी शिक्षण संस्थाचालकांची झोप उडवली आहे. एका विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने मोठी प्रश्नावली जारी केली असून, दिवाळी संपल्यानंतर संस्थाचालकांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे. यामुळे अनेक बड्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.”

मार्च महिन्यात नवा एफआरए (FRA) कायदा आणि ‘डी वाय पाटील’ संस्थेचा इशारा

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “शुल्क नियमन प्राधिकरणाची (FRA) कडक अंमलबजावणी होऊ नये, यासाठी सतेज पाटील वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचे. मात्र, येत्या मार्च महिन्यात आम्ही नवीन कडक एफआरए कायदा आणत आहोत. या कायद्याच्या माध्यमातून खासगी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून जी भरमसाठ फी वसुली करतात, त्यावर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण असेल. कुठेही मनमानी फी आकारली गेल्यास सरकार थेट कडक कारवाई करेल.”

शेवटी सतेज पाटील यांना इशारा देताना ते म्हणाले, “डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा सातबारा काढून तपासा, तो नेमका कोणाच्या नावावर आहे हे स्वतःच समोर येईल,” असे सांगत चंद्रकांत पाटलांनी या राजकीय संघर्षाला अधिक तीव्र वळण दिले आहे.

chandrakant-patil-warning-satej-patil-empire-gokul-politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात