‘हे लोक महायुतीत मिठाचा खडा टाकत आहेत’; हसन मुश्रीफांचा शिंदे गटाला सज्जड इशारा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर / मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा आणि पक्षात फूट पडणार असल्याच्या दाव्यांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्येच आता उघडपणे जुंपली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री व प्रवक्ते संजय शिरसाट आणि रायगडमधील आमदार महेंद्र थोरवे यांसारख्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या टीकेचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे.

“शिवसेनेचे संजय शिरसाट असोत किंवा रायगडमधील काही नेते असोत, ते महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर अत्यंत भयानक व बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करेन की, त्यांनी अशा वाचाळवीर नेत्यांना तातडीने कडक शब्दांत समज द्यावी,” अशी रोखठोक भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली आहे.

तसेच, अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्ष कमकुवत करण्याचा डाव आखला जात असला, तरी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार एकसंघ असून पक्षात तिसरा गट स्थापन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

“महायुतीच्या समन्वय समितीच्या निर्णयाला हरताळ; आमच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही!”: हसन मुश्रीफ

शिवसेनेच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींवर होणाऱ्या भाष्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र संताप व्यक्त केला, “महायुतीची जी समन्वय समिती आहे, त्यामध्ये तिन्ही घटक पक्षांनी (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) एकमेकांवर जाहीर टीका करू नये, असा सातत्याने सूर असतो. कोणाच्या काही तक्रारी असतील, तर त्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातल्या पाहिजेत. परंतु संजय शिरसाट आणि रायगडमधील काही नेते यातून कोणताही बोध घेत नाहीत आणि महायुतीत मिठाचा खडा टाकत आहेत.”

“अशा प्रकारच्या कृत्यांपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे आणि महायुतीमधील तिन्ही पक्षांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना तातडीने समज द्यावी. तसेच, विनाकारण आमच्या पक्षावर सातत्याने टीका करणाऱ्यांना माझी स्पष्ट सूचना आहे की, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करून आमच्या पक्षात नाक खुपसण्याची अजिबात गरज नाही,” अशा शब्दांत मुश्रीफ यांनी सुनावले.

“विलीनीकरणावर सुनेत्रा पवार आणि शरद पवार जे ठरवतील, तोच अंतिम निर्णय असेल!”

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा आणि काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या विधानावरही मुश्रीफ यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
“विलीनीकरणासंदर्भात मला सविस्तर माहिती नाही, कारण आम्ही गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाची निवडणूक आणि दिवाळी सणामुळे कोल्हापुरातच होतो. मात्र, या विषयावर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार जे ठरवतील, तोच अंतिम निर्णय असेल. दोन्ही नेते जो काही निर्णय घेतील, त्याच्या मागे संपूर्ण पक्ष भक्कमपणे उभा राहील.”

“काँग्रेसच्या लोकांनी काय बोलावे यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून त्यात काहीही तथ्य नाही. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही त्यांना याविषयी कल्पना देऊ, इतकेच मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते,” असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

“विमान अपघातात आमचे नेते गेल्याने पक्ष कमकुवत करण्याचा डाव; पण आम्ही चमकदार कामगिरी करू!”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून तिसरा गट तयार होणार असल्याच्या चर्चांना हसन मुश्रीफ यांनी पूर्णपणे फेटाळून लावले, “आमच्या पक्षाचे नेते अजित पवार विमान अपघातात दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला कसे कमकुवत करता येईल, असा डाव टाकण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व आमदार पूर्णपणे एकसंघ असून, राष्ट्रवादीचा तिसरा गट स्थापन होण्याचा कोणताही संबंध नाही. उलट, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी सर्व निवडणुकांमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करून दाखवू,” असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

sanjay-shirsat-mahayuti-hasan-mushrif-warning

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात