अजितदादा भाजपला कंटाळले होते, 2028 ला महायुतीतून बाहेर पडणार होते; लोंढेंच्या दाव्याला विकास लवांडेंचा दुजोरा!

विशेष प्रतिनिधी

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत होते, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला होता. आता या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनीही दुजोरा दिला आहे. 19 जानेवारी 2026 रोजी बारामती हॉस्टेलवर झालेल्या एका बैठकीचा संदर्भ देत लवांडे यांनी गौप्यस्फोट केला की, अजितदादा भाजपच्या कारभाराला कंटाळले होते आणि 2028 मध्ये महायुतीतून बाहेर पडणार होते, हे शंभर टक्के सत्य आहे. Ajit Pawar

बारामती हॉस्टेलवरील 19 जानेवारीच्या भेटीचा संदर्भ

अतुल लोंढे यांच्या विधानाचे समर्थन करताना विकास लवांडे यांनी बारामतीतील एका बैठकीचा तपशील जाहीर केला. लवांडे यांच्या म्हणण्यानुसार, 19 जानेवारी 2026 रोजी ते स्वतः आमदार रोहित पवार यांच्यासमवेत बारामती हॉस्टेलवर अजित पवार यांच्याशी चर्चा करत होते. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

भाजपसोबत फार काळ टिकणार नाही, दादांनी स्पष्ट सांगितले होते: लवांडे

बैठकीतील अजित पवार यांच्या संवादाचा दाखला देत विकास लवांडे यांनी दावा केला की, अजितदादांनी त्या वेळी स्पष्टपणे सांगितले होते की भारतीय जनता पार्टीबरोबर आपले फार काही टिकणार नाही. भाजपचा प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. त्यामुळे 2028 ला आपण या सरकारमधून बाहेर पडणार आहोत आणि आपल्याला एकत्रित आल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे खुद्द अजितदादांचे शब्द होते, असे लवांडे यांनी सांगितले. भाजपच्या एकंदरीत कारभाराला अजितदादा पूर्णपणे कंटाळले होते, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

अतुल लोंढे यांनी नेमका काय दावा केला होता?

यापूर्वी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी असा दावा केला होता की, अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने राजकीय लढा देऊन मुख्यमंत्री होण्याची त्यांची योजना होती. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे असे नियोजन होते; मात्र त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे अपेक्षित राजकीय घडामोडी घडू शकल्या नाहीत, असे लोंढे यांनी म्हटले होते. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि केलेल्या हालचालींवरून महायुतीतून बाहेर पडण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळतो, असेही लोंढे यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्या निधनानंतर हे दावे केले जात असले, तरी या विधानांना अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा महायुतीतील नेत्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Ajit Pawar Planned to Leave Mahayuti in 2028

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात