आदिवासी कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा जनजातीय गौरव – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
४० हजार कलाकारांची नोंदणी; राज्यभरातील अडीच हजार कलाकारांना गडचिरोलीत राज्यस्तरीय व्यासपीठ
आदिवासी भाषा, संस्कृती आणि परंपरांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवा – अभिनेते भरत गणेशपुरे
गडचिरोली, (जिमाका): एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे कठीण असलेल्या गडचिरोलीत आता देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा सोहळा आयोजित होत आहे, ही या जिल्ह्याच्या बदलत्या परिस्थितीची आणि विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीची महत्त्वपूर्ण ओळख आहे. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शौर्य, त्याग आणि समृद्ध संस्कृतीला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. गडचिरोलीसारख्या ऐतिहासिक आदिवासी भूमीत यंदाचा देशस्तरीय जनजातीय गौरव दिन साजरा होत आहे, ही विशेष अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जनजातीय कार्य मंत्री जुएल ओराम यांनी आज केले.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी कलाकारांच्या सहभागामुळे गडचिरोलीत आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरांचा अनोखा संगम साकारला आहे. पारंपरिक लोककला, लोकनृत्य, गायन, वाद्यवादन, हस्तकला आणि आधुनिक डिजिटल कलाविष्कारांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
गडचिरोलीची निवड बदलत्या परिस्थितीचे प्रतीक
केंद्रीय मंत्री जुएल ओराम म्हणाले की, गडचिरोलीची देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी निवड करण्यामागे विशेष महत्त्व आहे. एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे एकत्रित दौरे आयोजित करणे आव्हानात्मक होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाविरोधात करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे या भागातील परिस्थितीत मोठा बदल घडून आला आहे. नक्षलवादाच्या प्रभावातून बाहेर पडत गडचिरोली विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे. अशा भूमीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा सोहळा आयोजित होणे ही बदलत्या गडचिरोलीची महत्त्वपूर्ण ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असून आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांचा मोठा लाभ आदिवासी समाजाला होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वतंत्र जनजातीय कार्य मंत्रालयापासून राष्ट्रीय गौरव दिनापर्यंतचा प्रवास
आदिवासी समाजाच्या विकासाला स्वतंत्र प्रशासकीय दिशा देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र जनजातीय कार्य मंत्रालयाची स्थापना केली. या मंत्रालयाचा पहिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली, असे सांगत ओराम यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीचे स्मरण केले.
त्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जनजातीय कार्य मंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. या काळात आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्यांचा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्याबाबत चर्चा झाली. त्यातूनच २०२१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती, १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
देशातील ७०० हून अधिक आदिवासी समुदायांच्या इतिहासाचे स्मरण व्हावे, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान व्हावा आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीरांच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीला मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाचे स्मरण
भगवान बिरसा मुंडा यांच्यासह देशाच्या विविध भागांतील असंख्य आदिवासी क्रांतिवीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. गडचिरोलीच्या भूमीतील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी बलिदान दिले. मात्र, अशा अनेक आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास दीर्घकाळ पुरेशा प्रमाणात समाजासमोर आलेला नाही. या क्रांतिवीरांच्या त्यागाचे आणि शौर्याचे स्मरण करून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणे आवश्यक असल्याचे ओराम यांनी सांगितले.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास जतन करण्यासाठी देशभरात संग्रहालयांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यांच्या संघर्षाशी संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन, जतन आणि डिजिटायझेशन करून हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून देशभरातील आदिवासी क्रांतिवीरांना अभिवादन करण्याची आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनजातीय गौरव दिनाला व्यापक लोकसहभागाची जोड
जनजातीय गौरव दिनाचा राष्ट्रीय सोहळा यापूर्वी देशातील विविध भागांत आयोजित करण्यात आला असून यंदा सहाव्या जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय मुख्य सोहळ्याचे आयोजन गडचिरोलीत करण्यात आले आहे. या निमित्ताने आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान देशासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे.
यंदा १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत देशभर जनजातीय गौरव पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी समाजातील पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू तसेच पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात उल्लेख झालेल्या आदिवासी व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.
मागील वर्षी देशभरात दोन लाखांहून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि त्यामध्ये तीन कोटी ८० लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री ओराम यांनी दिली. जनजातीय गौरव दिन हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता आदिवासी समाजाच्या गौरवाची व्यापक लोकचळवळ बनावी, असे आवाहन त्यांनी केले.
गडचिरोलीतील भगवान बिरसा कला संगमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे अभिनंदन केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील कलाकारांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलेचा सन्मान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App