राष्ट्रवादीचे २०-३० आमदार फुटणार? तटकरे संतापले, राऊतांच्या मानसिक संतुलनावरच उपस्थित केले प्रश्न

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या काही आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असतानाच, आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी समोर येत सर्व तर्कवितर्कांवर पडदा टाकला आहे. “आमचा पक्ष पूर्णपणे एकसंघ असून सर्व 41 आमदार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासोबतच ठामपणे उभे आहेत; आमच्या पक्षात कोणतीही फूट पडणार नाही. ज्यांनी आम्हाला घडवले त्या दैवतासमान शरद पवार साहेबांना आजारपणात भेटायला जाणे हे आमचे कर्तव्यच आहे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी सुद्धा मुंबईत आल्यावर पवार साहेबांना नक्की भेटायला जाणार आहे,” असे महत्त्वपूर्ण विधान सुनील तटकरे यांनी केले आहे.

या वेळी बोलताना सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार फुटून भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचाही चांगलाच समाचार घेतला.

“सकाळी एखादे नॅरेटिव्ह सोडून दिवसभर टीव्हीवर दिसणे, एवढेच राऊतांना उरले आहे!”: तटकरेंचा घणाघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर सुनील तटकरे चांगलेच आक्रमक झाले.

राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले

“माझे आणि संजय राऊत यांचे वैयक्तिक सलोख्याचे संबंध आहेत; परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून राऊतांचे मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळले आहे. कल्पोकल्पित कथा रचणे आणि सकाळी भोंग्याद्वारे एखादे खोटे नॅरेटिव्ह सोडून दिवसभर टीव्हीवर दिसणे, एवढेच काम त्यांना आता उरले आहे.”

सर्व 41 आमदार एकसंघ

“आमच्या पक्षात कोणतीही अस्वस्थता नाही आणि आमदार फुटण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 41 आमदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहेत,” असे तटकरे यांनी ठामपणे सांगितले.

“ज्या दैवताने घडवले, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात गैर काय?; मी सुद्धा भेटणार!”

अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट मागितल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी अत्यंत भावनिक आणि स्पष्ट भूमिका मांडली.

6 दशकांचे समर्पण आणि महाराष्ट्राची संस्कृती

“आमदारांनी वेळ मागितली की नाही याची मला थेट माहिती नाही. परंतु शरद पवार साहेबांनी आपल्या आयुष्याची तब्बल 6 दशके (60 वर्षे) या देशासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली आहेत. आज साहेबांची तब्येत ठीक नसताना त्यांना भेटायला जाणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.”



राजकीय भूमिका वेगळी, पण आदर कायम

“आम्ही आज राजकारणात ज्या काही पदांवर आणि ठिकाणी आहोत, आम्हा सर्वांना शरद पवार साहेबांनीच घडवले आहे. मधल्या काळात आम्ही वेगळा राजकीय विचार स्वीकारून एनडीएमध्ये (NDA) सहभागी झालो हे खरे असले, तरी ज्या दैवताने आम्हाला घडवले त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला एखादा आमदार किंवा कार्यकर्ता गेला, तर त्यात गैर काय? मी स्वतः सुद्धा जेव्हा मुंबईत असेन, तेव्हा पवार साहेबांना नक्की भेटायला जाणार आहे; कारण हीच आपल्या महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा आहे.”

“विलीनीकरणाच्या चर्चेत काही तथ्य नाही; मुख्यमंत्र्यांची भेट केवळ दिवाळीच्या शुभेच्छांसाठी!”

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतही सुनील तटकरे यांनी खुलासा केला.

सुनेत्रा वहिनींनी दिलेले उत्तर पुरेसे

“दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत कालच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींनी पत्रकार परिषदेत अगदी स्पष्ट उत्तर दिले आहे की, ‘ज्या वेळेला जे काही असेल ते त्या वेळेला कळेल.’ यापेक्षा या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये सध्या काही तथ्य आहे, असे मला तरी वाटत नाही.”

55 कोटींच्या रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन आणि पेशवे स्मारकाचे लोकार्पण

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचे कारण सांगताना तटकरे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या रोहा शहरात 55 कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन आणि श्रीवर्धन येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या भव्य स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांनी उपस्थित राहावे, यासाठी मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले आहे.”

Sunil Tatkare on NCP Split, 41 MLAs Support Sunetra Pawar, Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात