यूपीच्या राजकारणात मोठा भूकंप! ओवेसी-चंद्रशेखर आझाद आले एकत्र; सर्व 403 जागांवर लढणार, सीएम चेहऱ्याचीही घोषणा!

विशेष प्रतिनिधी

लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांना नवी कलाटणी देणारी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी एकत्र येत एका मोठ्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या आघाडीचे नाव ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ असे ठेवण्यात आले असून, हा मोर्चा उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

गुरुवारी लखनौमध्ये पार पडलेल्या एका हाय-व्होल्टेज संयुक्त पत्रकार परिषदेत असदुद्दीन ओवेसी यांनी थेट मोठी घोषणा केली. “उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद हेच आमच्या युतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी आणि राज्यातील जनतेला एक नवा विश्वास देण्यासाठी आमचा हा मोर्चा सर्वात मजबूत व प्रभावी पर्याय ठरेल, असा दावाही ओवेसी यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार चंद्रशेखर आझाद यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. “हा केवळ ‘तिसरा मोर्चा’ नसून उत्तर प्रदेशातील पहिला आणि सर्वात मजबूत मोर्चा ठरेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आम्ही इतर मोठ्या आघाड्यांमध्ये सहभागी होण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, परंतु आम्हाला कमी लेखण्यात आले आणि आमचा आदर राखला गेला नाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. Owaisi and Chandrashekhar Azad

४०% दलित-मुस्लिम व्होटबँकेवर लक्ष: उत्तर प्रदेशातील लोकसंख्येच्या समीकरणांचा विचार केल्यास, राज्यात तब्बल १९% मुस्लिम आणि २१% दलित लोकसंख्या आहे. अशा प्रकारे एकूण ४०% निर्णायक व्होटबँकेवर या नव्या आघाडीची थेट नजर आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ओवेसी आणि चंद्रशेखर आझाद यांच्या या युतीचा थेट फटका अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला (SP) आणि मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला (BSP) बसण्याची दाट शक्यता आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या दाव्यावर ओवेसींचे प्रश्नचिन्ह

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधताना ओवेसी म्हणाले की, १० एप्रिल रोजी अंतिम एसआयआर (SIR) प्रसिद्ध झाल्यानंतर ‘बाबा’ बहुसंख्य समाजातील तब्बल १२.७ दशलक्ष नावे वगळल्याच्या आकड्यापर्यंत नक्की कसे पोहोचले? “मुख्यमंत्र्यांनी बहुदा गणितात पीएचडी केली असावी,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची देशनिहाय यादी जाहीर करावी आणि यापैकी किती व्यक्ती बांगलादेशी, पाकिस्तानी किंवा गैर-भारतीय नागरिक आहेत हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

“जे काचेच्या महालात राहतात…”; ओवेसींचा अखिलेश यादवांवर सडकून टीका

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर सडकून टीका करताना ओवेसी म्हणाले की, “त्यांच्या गाडीवर केवळ गोळीबार झाला होता की पोटात गोळी लागली होती? माझे भाऊ चंद्रशेखर आझाद यांच्या पाठीत गोळी लागल्याची जखम आणि त्याची वेदना आजही कायम आहे.” ते पुढे म्हणाले, “जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड भिरकावू नयेत.” केवळ वारसा किंवा हक्काचे राजकारण करणाऱ्यांना सर्वसामान्यांचे हाल समजू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

“अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री आहेत आणि तसेच राहतील!”

भाजपला मदत करणाऱ्यांनाच सुरक्षा पुरवली जाते, या अखिलेश यादव यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर देताना ओवेसी म्हणाले, “उद्या जर सरकारने आमची सुरक्षा काढून घेतली, तरी आमचा स्पष्टवक्तेपणा आणि लढा कमी होणार नाही.” अखिलेश यांच्यावर उपरोधिक वार करत ते म्हणाले की, “अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि इंशाअल्लाह ते पुढेही ‘माजी’ मुख्यमंत्रीच राहतील.”



२६ नोव्हेंबरला संविधान दिनी लखनौमध्ये भव्य महारॅली व जाहीरनामा

चंद्रशेखर आझाद यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, संविधान दिनानिमित्त म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी लखनौ येथील ऐतिहासिक माता रमाबाई मैदानावर ‘बहुजन समाज महासंमेलन महारॅली’ आयोजित करण्यात येईल. मंचावरून त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांना प्रेमाने ‘असद भाई’ असे संबोधून रॅलीत सहभागी होण्याचे आव्हाहन केले. या महारॅलीनंतर मोर्चा आपला अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करेल, असे स्पष्ट करण्यात आले.

सपा-काँग्रेस युती ही ‘अयशस्वी’ आघाडी

चंद्रशेखर आझाद यांनी दावा केला की, हा ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा सत्तापालट घडवून आणेल. २०१४, २०१७, २०१९ आणि २०२२ च्या अयशस्वी आघाड्यांमधून धडा घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत. अहंकार आणि स्वार्थाने ग्रासलेले नेते कोणाच्याही वेळेचा किंवा प्रतिष्ठेचा आदर करत नाहीत, अशी जोरदार टीका त्यांनी सपा-काँग्रेस आघाडीवर केली.

Owaisi and Chandrashekhar Azad Join Hands for UP Elections, Announce Alliance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात