विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार असून, या सहकार्यामुळे राज्यातील विकासात्मक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रस्ते सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य, निरोगी शहरे आणि प्रशासनातील नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासन आणि ब्लूमबर्ग यांच्यात सहकार्य सुरू आहे. ही भागीदारी परिवर्तन घडवून आणणारी आणि ऐतिहासिक ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ब्लूमबर्गचे संस्थापक मायकल ब्लूमबर्ग यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हॉटेल सेंट रेजिस येथे भेट घेतली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्रातील ब्लूमबर्गच्या व्यावसायिक आणि सामाजिक योगदानाचे कौतुक केले. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ ढवसे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये
मुंबई आणि न्यूयॉर्क या दोन्ही शहरांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत. मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असून, महाराष्ट्राच्या विकासात या शहराचे महत्त्वाचे स्थान आहे. अशा शहराच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतचे सहकार्य उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ब्लूमबर्गने भारतात व्यवसायाची ३० वर्षे पूर्ण केली असून, या प्रवासात महाराष्ट्राचे विशेष योगदान राहिले आहे. कंपनीचे भारतातील मुख्यालय मुंबईत असून, मुंबई आणि पुणे येथेही तिची कार्यालये आहेत. पुण्यात संशोधन, विकास आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ ब्लूमबर्ग टर्मिनल्सच्या निर्मितीसाठी काम करत आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मायकल ब्लूमबर्ग यांच्याशी २०१४ मध्ये झालेली पहिली भेट आणि २०१८ मध्ये त्यांच्या कार्यालयाला दिलेली भेट यांची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. त्यांच्याशी झालेला संवाद हा शिकण्याचा अनुभव होता, असे त्यांनी नमूद केले.
रस्ते सुरक्षा, आरोग्य आणि प्रशासनासाठी सहकार्य
महाराष्ट्र शासन आणि ब्लूमबर्ग यांच्या भागीदारीतून रस्ते सुरक्षा, आरोग्यविषयक माहिती व्यवस्था, निरोगी शहरे आणि प्रशासनातील नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये या क्षेत्रांशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांसाठी ब्लूमबर्गकडून मिळणारे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मायकल ब्लूमबर्ग आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. शहरांच्या विकासासाठी केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नव्हे, तर नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक सेवांची गुणवत्ता सुधारणेही आवश्यक असल्याचे या भागीदारीतून अधोरेखित होत आहे.
मुंबईत मेट्रोचे ३५० किलोमीटरचे जाळे विकसित करण्याचे उद्दिष्ट
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पांचा उल्लेख केला. मुंबईत मेट्रोचे जाळे पूर्वी केवळ ११ किलोमीटर होते. आता सुमारे ३५० किलोमीटरचे मेट्रो जाळे विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यापैकी सुमारे १०० किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून, पुढील वर्षापर्यंत आणखी ७० किलोमीटरचे मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. २०२९-३० पर्यंत संपूर्ण मेट्रो जाळे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील अनेक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यातही मेट्रोचे विस्तृत जाळे विकसित केले जात आहे. द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास नागरिकांच्या प्रवासाच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मायकल ब्लूमबर्ग यांनी व्यक्त केला अभिमान
भारतात व्यवसायाची ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत मायकल ब्लूमबर्ग यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या भूमिकेचे कौतुक केले. भारतात व्यवसाय सुरू केला, तेव्हा एका छोट्या सामायिक जागेतून कामकाजाला सुरुवात झाली होती. मात्र, आज भारतातील व्यवसायाचे मुख्यालय मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईसह देशभरात कंपनीकडून सातत्याने गुंतवणूक केली जात असून, पुण्यात १०० हून अधिक अभियंते कार्यरत आहेत. पुण्यात उभारण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी केंद्राचा भविष्यात आणखी विस्तार करण्याची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छ ऊर्जेसाठीही उपक्रम
ब्लूमबर्गची भारताप्रती असलेली बांधिलकी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसल्याचे मायकल ब्लूमबर्ग यांनी सांगितले. गेल्या जवळपास २० वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य, रस्ते सुरक्षा, स्वच्छता आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांतील विविध उपक्रमांना सहकार्य केले जात आहे.
भारतासह महाराष्ट्रात मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी भविष्यातही नागरिकांसाठी उपयुक्त उत्पादने विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासन आणि ब्लूमबर्ग यांच्यातील भागीदारीमुळे शहरांचा विकास, सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा आणि नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App