विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या घटनेचे पडसाद आता मुंबईत उमटले आहेत. या घटनेनंतर भाजप आणि मनसेमध्ये राजकीय संघर्ष पेटला असून, मंगळवारी माहिममध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. घोषणाबाजी आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. Amit Thackeray Removes PM Modi’s Photo
अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने आंदोलनाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक माहिममध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मनसेचे कार्यकर्तेही तिथे पोहोचल्याने दोन्ही गटांमध्ये आमनेसामने येण्याची परिस्थिती निर्माण झाली.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या दिशेने हटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आले. मात्र, घोषणाबाजीमुळे माहिम परिसरातील वातावरण काही काळ चांगलेच तापले होते.
पुण्यात नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी, पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाला भेट दिली होती. विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी ते महाविद्यालयात गेले होते.
यावेळी प्राचार्यांच्या कार्यालयातील एका भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे एका विद्यार्थ्याने अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
यानंतर अमित ठाकरे यांनी एका मनसैनिकाला सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या ठिकाणाहून काढून टाकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली.
या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह एकूण १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर भाजप युवा मोर्चाने अमित ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.
भाजप युवा मोर्चाचा माहिममध्ये आंदोलनाचा इशारा
भाजप युवा मोर्चाकडून मंगळवारी माहिममध्ये दुपारी ३ वाजता अमित ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच अमित ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवतीर्थबाहेर जमू लागले. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाला मनसेकडूनही प्रत्युत्तर दिलं जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनावरून आक्रमक भूमिका घेतली. भाजप कार्यकर्त्यांनी इथे येऊ नये, असा इशारा देतानाच त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
‘आझाद मैदानात आंदोलन करा’; संदीप देशपांडेंचा इशारा
शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी भाजप युवा मोर्चाला थेट आव्हान दिलं. “भाजपचे कार्यकर्ते इथे येतील, पण परत जाणार नाहीत. आम्ही त्यांना मोदक आणि पुरणपोळी देणार आहोत,” असं ते म्हणाले.
अमित ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदानात आंदोलन करा, असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी असल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे तिथे जाऊन आंदोलन करावं, अशी भूमिका देशपांडे यांनी मांडली.
तसंच, “इथे येऊन आंदोलन करणार असाल तर आम्ही तयारच बसलो आहोत. तेल लावलेले बांबू तयार आहेत,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘शिवतीर्थपर्यंत यायचं असेल तर वेलकम’; अविनाश जाधव
मनसे नेते अविनाश जाधव यांनीही भाजपला प्रत्युत्तर दिलं. संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी आपण शिवतीर्थवर आलो होतो आणि भाजपचे कार्यकर्ते येणार असल्याचं समजल्यानंतरही मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते जमा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
“जर आम्ही कोणाला बोलावलं असतं तर शिवाजी पार्क कमी पडलं असतं. भाजप युवा मोर्चाला शिवतीर्थपर्यंत यायचं असेल तर त्यांचं वेलकम आहे,” असं अविनाश जाधव म्हणाले.
सरकार आंदोलनाला परवानगी देत असेल तर भाजपलाही परवानगी द्यावी. शिवतीर्थवर आंदोलनाला परवानगी दिली, तरी आम्ही तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपकडूनही आक्रमक प्रतिक्रिया
दुसरीकडे, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने मनसेला संयम राखण्याचा सल्ला देत सूचक इशारा दिला. “त्यांना थोडं थांबायला सांगा. सब्र का फल मीठा होता है. आम्ही येत आहोत, तुम्ही तयार राहा,” असं त्यांनी म्हटलं.
पोलिसांनी सहकार्य करावं, अशी मागणीही त्यांनी केली. आपण सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने पदाची प्रतिष्ठा आणि संयम राखत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, संयमाचा बांध फुटू देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली.
पोलिसांकडून दोन्ही गटांची धरपकड
भाजप युवा मोर्चाचं नियोजित आंदोलन सुरू होण्यापूर्वीच मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याने माहिम परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यातील महाविद्यालयातील एका फोटोवरून सुरू झालेला वाद आता मुंबईपर्यंत पोहोचल्याने भाजप आणि मनसेमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App