विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशातील नोकरीसाठी सर्वाधिक तयार आणि कौशल्यसंपन्न तरुण कोणत्या राज्यात आहेत, याबाबतच्या इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२६ मध्ये उत्तर प्रदेशने अव्वल स्थान मिळवले असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. Uttar Pradesh
अहवालानुसार उत्तर प्रदेशातील तरुणांची रोजगारक्षमता ७८.६४ टक्के, तर महाराष्ट्राची ७५.४२ टक्के नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर कर्नाटक ७३.८५ टक्के, केरळ ७२.१६ टक्के आणि दिल्ली ७१.२५ टक्क्यांसह पहिल्या पाच राज्यांमध्ये आहेत.
या क्रमवारीचा अर्थ उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत असा नाही. ही आकडेवारी संबंधित राज्यांतील उमेदवारांची कौशल्ये, क्षमता आणि नोकरीसाठीची तयारी, म्हणजेच रोजगारक्षमता दर्शवते.
भारताची एकूण रोजगारक्षमता २०२६ मध्ये ५६.३५ टक्क्यांवर पोहोचली आहे. २०२५ मध्ये ती ५४.८१ टक्के होती.अहवालाचा यंदाचा मुख्य भर बदलत्या रोजगारविश्वावर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल कौशल्ये, स्वतंत्र काम, तात्पुरत्या प्रकल्पांवरील रोजगार, घरून काम आणि उद्योजकता यामुळे कंपन्यांच्या भरतीच्या पद्धती वेगाने बदलत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२२ ते २५ वयोगट सर्वाधिक रोजगारक्षम
वयोगटानुसार पाहता २२ ते २५ वर्षांतील तरुण सर्वाधिक रोजगारक्षम ठरले असून या गटाची रोजगारक्षमता ७५.७ टक्के आहे. हा वयोगट विशेषतः सुरुवातीच्या स्तरावरील नोकऱ्यांसाठी सर्वाधिक तयार असल्याचे अहवालातून दिसते.
अहवालातील आकडेवारीनुसार २६ ते २९ वर्षे आणि १८ ते २१ वर्षे या वयोगटांतील उमेदवारांची रोजगारक्षमताही ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसते. रोजगारक्षमतेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा बदल समोर आला आहे. महिलांची रोजगारक्षमता ५४ टक्के, तर पुरुषांची ५१.५ टक्के नोंदविण्यात आली आहे. अहवालानुसार महिलांनी नोकरीसाठीच्या तयारीत पुरुषांना मागे टाकले असून डिजिटल शिक्षण, लवचिक नोकऱ्या आणि नव्या क्षेत्रांतील कौशल्यविकास यामागे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रानुसार संगणकशास्त्राशी संबंधित उमेदवारांची रोजगारक्षमता सुमारे ८० टक्के, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांची सुमारे ७८ टक्के असल्याचे अहवालात नमूद आहे.
दुसरीकडे MBA पदवीधारकांची रोजगारक्षमता ७२.७६ टक्क्यांवर असून अभियांत्रिकी पदवीधारकांची एकूण रोजगारक्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ITI उमेदवारांची रोजगारक्षमता ४५.९५ टक्के आणि पॉलिटेक्निक पदविकाधारकांची ३२.९२ टक्के नोंदविण्यात आली आहे.
कंपन्यांकडून आता केवळ पदवीपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, क्लाऊड कम्प्युटिंग आणि सायबर सुरक्षा यांसारख्या कौशल्यांना अधिक मागणी असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असतानाच शहरांच्या यादीतही पुण्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. अहवालाशी संबंधित आकडेवारीनुसार लखनऊ ७९.४५ टक्क्यांसह आघाडीवर, तर पुणे ७८.९२ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बंगळुरू ७७.८४ टक्के, कोची ७६.५६ टक्के आणि चंदीगड ७५.१२ टक्क्यांसह आघाडीच्या शहरांमध्ये आहेत.
भारतामध्ये कायमस्वरूपी नोकरीच्या पारंपरिक पद्धतीबरोबरच स्वतंत्र, गिग आणि प्रकल्पाधारित रोजगार वेगाने वाढत आहेत.भारताची गिग आणि स्वतंत्र कामगारांची संख्या २०३० पर्यंत २.३५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. प्रकल्पाधारित भरतीत मागील वर्षात जवळपास ३८ टक्के वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय सेवा, उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्र हे प्रमुख रोजगारनिर्मिती क्षेत्र म्हणून पुढे येत आहेत.
भारताचा जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यसाठ्यातील वाटा सुमारे १६ टक्के असून २०२७ पर्यंत देशातील AI कौशल्यसंपन्न मनुष्यबळ १२.५ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी ही क्रमवारी सकारात्मक असली तरी एक महत्त्वाची बाब स्पष्ट आहे. रोजगारक्षमता वाढणे म्हणजे आपोआप रोजगार मिळणे नव्हे. उमेदवार नोकरीसाठी किती तयार आहे हे या अहवालातून दिसते, प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले किंवा किती जणांना नोकरी मिळाली, याची ही क्रमवारी नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App