विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्यातील विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली. यावेळी त्यांनी हिंजवडीतील पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे या परिसराशी अप्रत्यक्षपणे जोडलेले सुमारे 15 लाख रोजगार धोक्यात येऊ शकतात, असा दावा केला.
पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांवरून राज्य सरकारवर टीका केली.
“अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याचा विचार करत आहेत. त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नाहीत. रस्ते, पाणी आणि वीजेच्या समस्या कायम आहेत,” असे ठाकरे म्हणाले.
हिंजवडी आयटी पार्कवर जवळपास साडेसहा लाख लोक थेट अवलंबून आहेत, तर या परिसरातून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायामुळे जवळपास 15 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो, असा दावा त्यांनी केला.
हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून गंभीर असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले की, या भागातील काही मूलभूत समस्या सोडवल्यास नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होऊ शकतो.
स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी पदपथ नाहीत, रस्त्यांची अवस्था खराब आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे आणि सर्व इमारतींमध्ये पाइपद्वारे गॅस सुविधा उपलब्ध नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
हिंजवडी मेट्रोबाबतही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. मेट्रोचे काम पूर्ण होऊनही सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे त्यांनी म्हटले.
विविध सरकारी यंत्रणांच्या अखत्यारीतील रस्त्यांमुळेही गोंधळ निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही चौकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील रस्ते असल्याने जबाबदारी निश्चित होत नसल्याचे ठाकरे म्हणाले.
गेल्या तीन ते चार वर्षांत या भागात नवीन कंपन्या फारशा आल्या नसल्याचाही त्यांनी दावा केला. सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांनाही फेज 3 मधून फेज 1 मध्ये जाण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, स्मार्ट सिग्नल बसवणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि मूलभूत सुविधा सुधारणे या काही महत्त्वाच्या उपायांवर तातडीने काम करण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले.
राज्य सरकारने काही महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले, तर हिंजवडीतील रोजगार टिकवता येतील आणि कंपन्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्यापासून रोखता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App