विशेष प्रतिनिधी
कराड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील महागडी ‘डिफेंडर’ कार सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. आलिशान कारमधून प्रवास करत असल्यावरून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून होत असलेल्या टीकेला जरांगे यांनी कराड तालुक्यातील सभेत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
“मी डिफेंडरमध्ये फिरतोय, यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का? तुला काय करायचं? मी कोणत्याही गाडीत बसेल. मला माझी जात मोठी करायची आहे. माझ्या समाजाचे लेकरं मला लाल दिव्याच्या गाडीत बसलेले बघायचे आहेत,” अशा शब्दांत जरांगे यांनी टीकाकारांना सुनावले.
डिफेंडर माझ्या मालकीची नाही : जरांगे
डिफेंडर कार स्वतःच्या मालकीची नसल्याचे जरांगे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. समाजातील कार्यकर्ते प्रवासासाठी आपल्या गाड्या देतात आणि त्याचप्रमाणे ही डिफेंडरही एका समाजबांधवाने वापरण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, चर्चेत असलेली डिफेंडर सांगोला तालुक्यातील चिक महूद येथील व्यापारी आणि प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांची असल्याचे समोर आले आहे. भोसले यांनी ही गाडी सुमारे १.९० कोटी रुपयांना खरेदी केली असून, त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले जाते. जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील प्रवासाचा त्रास कमी व्हावा, यासाठी ही गाडी वापरण्यास दिल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
“आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढणार”
डिफेंडरच्या वादावर स्पष्टीकरण देतानाच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. “मी तुमच्याशी कधीच गद्दारी करणार नाही. आरक्षण घेण्यासाठी शेवटपर्यंत लढणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. समाजाने एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करताना भविष्यातील पिढ्यांचा विचार करून आताच सावध होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
“आपण एकत्र आलो नाही, तर आपल्या मुळावर घाव बसतो. आपल्या समाजाच्या नोंदी रद्द करण्याचे काम झाले. त्यामुळे भविष्याचा विचार करून सावध होणे गरजेचे आहे,” असे जरांगे म्हणाले.
२९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात जनजागृती दौरा सुरू आहे. कराड तालुक्यातील मसूर येथेही त्यांचा मेळावा पार पडला.
कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी सरकारसह विविध पक्षांतील मराठा लोकप्रतिनिधींवरही टीका कायम ठेवली आहे. काही कुणबी प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत जरांगे यांनी दिले आहेत.
डिफेंडर कारवरून सुरू झालेल्या वादामुळे त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला राजकीय चर्चेचे वेगळे वळण मिळाले असले, तरी आपला मुख्य लढा मराठा आरक्षणासाठीच असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App