गणेश नाईकांचा शिंदेंवर पुन्हा निशाणा; ‘बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र १० वर्षे मागे’

विशेष प्रतिनिधी 

नवी मुंबई : वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बिल्डरांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेल्याचा आरोप नाईक यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. Ganesh Naik on Eknath Shinde

सानपाडा येथील एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेचा वापर करण्यावर आक्षेप घेतला. कॉलनी भागातील २० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी पुनर्विकासाऐवजी क्लस्टर योजना लागू करणे शहराच्या दृष्टीने घातक असल्याचे त्यांनी म्हटले.

“स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांच्या नादी लागून यांनी महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला आहे. कॉलनी भागातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना लागू करणे म्हणजे बिल्डरांच्या घशात पैसे घालण्यासारखे आहे. मात्र, असा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल,” अशी भूमिका नाईक यांनी मांडली.

जनतेला गृहीत धरून कोणी राजकारण करणार असेल, तर त्याला उत्तर देण्याची ताकद आपल्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. “माझा कोणत्याही व्यक्तीशी वाद नाही. मात्र, जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल, असा समज ठेवून कोणी नाटक करेल, तर त्या नाटकाचा तमाशा काय आहे हे दाखवण्याचे काम गणेश नाईक करेल,” असा इशारा त्यांनी दिला.

आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका

नाईक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मंत्र्यांकडे विविध प्रकारची माहिती आणि आकडेवारी येत असते, त्यामुळे नाईक यांच्या वक्तव्यात तथ्य असण्याची शक्यता असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी दहा वर्षांत नव्हे, तर अनेक शतके मागे जाण्याइतके काम केले असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच, एखाद्या प्रकरणात नाव आल्यानंतर काही जण दरेगावला का जातात, याचा विचार करण्याची गरज असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.



योगेश कदमांचा गणेश नाईकांना पलटवार

दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पलटवार केला. गणेश नाईक यांनी आता अशी वक्तव्ये थांबवावीत, असे आवाहन त्यांनी केले.

“आपण महायुतीमध्ये सोबत आहोत आणि एकत्र काम करत आहोत. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी उठाव केला नसता, तर आज गणेश नाईक मंत्रीही नसते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे,” असे कदम म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगले संबंध असून महायुतीमध्ये कटुता निर्माण होणार नाही, याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी घ्यावी, असेही कदम यांनी सांगितले.

गणेश नाईक यांच्या मनात काही नाराजी किंवा खदखद असेल, तर त्यांनी ती वरिष्ठ नेत्यांकडे मांडावी आणि हा विषय कायमस्वरूपी मिटवावा, अशी विनंतीही योगेश कदम यांनी केली.

दरम्यान, गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकरणावर पुढील काळात दोन्ही बाजूंकडून आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Ganesh Naik on Eknath Shinde: ‘Builders Have Set Maharashtra Back by 10 Years’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात