Schoolgirls Viral Video Impact : बातम्यांनी नाही, शाळकरी मुलींच्या व्हिडिओने प्रशासन जागं केलं! कर्जतच्या खड्ड्यांवर तातडीने कारवाई

विशेष प्रतिनिधी

रायगड : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त आहेत. ‘रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता?’ अशी परिस्थिती अनेक मार्गांवर पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडे तक्रारी, आंदोलने आणि बातम्यांनंतरही काही ठिकाणी परिस्थितीत फारसा बदल झालेला नसल्याची नागरिकांची नाराजी आहे.

मात्र, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात काही शाळकरी मुलींनी केलेल्या अनोख्या ‘ग्राउंड रिपोर्टिंग’ने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. विद्यार्थिनींनी रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती आपल्या खास शैलीत मांडत तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओची दखल आता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घेतली आहे.

मुलींच्या व्हिडिओतून रस्त्यांची दुरवस्था समोर

कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंदीवडे गावातील शाळकरी विद्यार्थिनींनी आपल्या परिसरातील खराब रस्त्यांचा प्रश्न मांडण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला. रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यातून वाहनचालकांना करावा लागणारा त्रास आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे त्यांनी या माध्यमातून लक्ष वेधले.

विद्यार्थिनींच्या या अनोख्या पद्धतीने केलेल्या रिपोर्टिंगची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचेही या समस्येकडे लक्ष गेले.



आमदार महेंद्र थोरवेंकडून तातडीची दखल

या व्हिडिओची शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दखल घेतली. संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या छोट्याशा प्रयत्नामुळे त्यांच्या परिसरातील रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधले गेले आहे.

पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम

दरम्यान, या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याबाबतही आमदार महेंद्र थोरवे यांनी माहिती दिली आहे. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे काम करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे विद्यार्थिनींनी केलेल्या या ‘ग्राउंड रिपोर्ट’चा परिणाम केवळ सोशल मीडियावरील चर्चेपुरता मर्यादित राहिला नसून, प्रत्यक्ष रस्त्यावरही हालचाली सुरू झाल्या आहेत.

‘ग्राउंड रिपोर्टिंग’ची सोशल मीडियावर चर्चा

सामान्य नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असतानाही अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, शाळकरी मुलींनी आपल्या पद्धतीने केलेल्या रिपोर्टिंगने काही तासांतच या समस्येला व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली.

त्यामुळे कर्जत तालुक्यातील या विद्यार्थिनींच्या धाडसी आणि कल्पक प्रयत्नाचे कौतुक होत असून, स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करता येऊ शकतो, याचे हे उदाहरण ठरत आहे.

Schoolgirls Viral Video Impact raigad district

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात