विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गावागावातील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशव्यापी मोहीम जाहीर केली आहे. येत्या 15 ऑगस्टला केवळ स्वातंत्र्यदिन साजरा न करता सरकारी शाळांच्या सुधारणेला सुरुवात करावी, असे आवाहन दिपके यांनी केले आहे. Abhijeet Dipke
10 ऑगस्ट रोजी बोलताना अभिजीत दिपके यांनी देशातील ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत आहेत का, याची तपासणी करण्यासाठी पालकांनी सामाजिक लेखापरीक्षण (Social Audit) करावे, असे त्यांनी म्हटले.
सरपंचांनी सरकारी शाळांची जबाबदारी घ्यावी
गावातील सरकारी शाळा ही केवळ शिक्षण विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण गावाची जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी गावातील सरकारी शाळांच्या सुधारणेची जबाबदारी पुढाकाराने घ्यावी, असे आवाहन दिपके यांनी केले.
शाळांमध्ये इमारत, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज, वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा यांसारख्या मूलभूत बाबींची पाहणी करून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘15 ऑगस्टला नवी सुरुवात करूया’
“या 15 ऑगस्टला आपण कोणत्या एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, काहीतरी नवीन सुरुवात करायची असेल, तर ती आपल्या सरकारी शाळांमध्ये सुधारणा करण्यापासून करायला हवी,” असा संदेश अभिजीत दिपके यांनी दिला.
या मोहिमेच्या माध्यमातून पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी सरकारी शाळांच्या प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील सरकारी शाळांची गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सामाजिक लेखापरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देणे, हा या देशव्यापी मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App