विशेष प्रतिनिधी
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक A. R. Rahman यांचा मुलगा व पार्श्वगायक ए. आर. अमीन याच्या कारला चेन्नईत अपघात झाला. सुदैवाने या अपघातात अमीन आणि त्याच्या मित्रांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
सोमवारी, 10 ऑगस्ट रोजी चेन्नईतील गिंडी परिसरातील काथीपारा उड्डाणपुलाजवळ ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बाजूच्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या एका Wagon-R कारची अमीनच्या Porsche कारला धडक बसली.
Porsche कारला Wagon-R ची धडक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमीन आपल्या मित्रांसोबत कोयंबेडू परिसरातून प्रवास करत होता. त्यावेळी हा अपघात झाला. धडकेनंतर अमीन आणि कारमधील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, अपघाताबाबत ए. आर. अमीन किंवा ए. आर. रहमान यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नाही.
दैव बलवत्तर; मोठा अनर्थ टळला
कारचा अपघात गंभीर स्वरूपाचा असल्याचे समोर आले असले, तरी अमीन आणि त्याच्या मित्रांना मोठी दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे या घटनेनंतर चाहत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अमीनची संगीत क्षेत्रात वाटचाल
ए. आर. अमीन हा आपल्या वडिलांप्रमाणेच संगीत क्षेत्रात सक्रिय आहे. तो पार्श्वगायक असून त्याने विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 2015 मध्ये ‘ओ कधल कणमणी’ या तमिळ चित्रपटातून त्याने गायन क्षेत्रात पदार्पण केले.
अमीनने नुकतेच राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटातील ‘चिकिरी चिकिरी’ हे गाणे तमिळमध्ये गायले आहे. याशिवाय जसलीन रॉयलसोबत त्याने ‘भीगी भीगी’ हा स्वतंत्र संगीत ट्रॅकही केला आहे. या गाण्यात दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर झळकले होते.
अमीन आपल्या वडिलांसोबत विविध देशांमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टमध्येही परफॉर्म करतो. यासोबतच तो स्वतंत्र म्युझिक प्रोजेक्ट्सवरही काम करत आहे.
ए. आर. रहमानही नव्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त
दरम्यान, ए. आर. रहमान यांच्या हातात सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ‘पेड्डी’ आणि ‘मैं वापस आऊंगा’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले आहे. त्यांचे आगामी ‘रामायण: भाग 1’, ‘रामायण: भाग 2’, ‘बंटवारा 1947’ आणि ‘मून वॉक’ हे प्रोजेक्ट्स चर्चेत आहेत.
अमीनच्या Porsche कारला झालेल्या या अपघाताची नेमकी कारणं काय होती आणि पुढील तपासात काय समोर येतं, याकडे आता लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App