चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. ३० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघांनी हल्ले केले. या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदेवाही आणि पोंभुर्णा तालुक्यात वाघाचे हल्ले
सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथे शेतात काम करत असताना ७० वर्षीय शेतकरी पत्रुजी मेश्राम यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
दुसरी घटना पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात घडली. ६० वर्षीय राजेश्वर सिडाम हे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आठवडाभरात वाघांच्या हल्ल्यात तीन बळी
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. आठवडाभरातच वाघांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, गुराखी आणि जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गडचिरोलीतही वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
दरम्यान, शेजारील गडचिरोली जिल्ह्यातही वाघाच्या हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धानोरा तालुक्यातील तुडमेल गावात २६ वर्षीय शांताराम मनू मडावी या तरुण शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
शांताराम हे आपल्या धानपिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नीने शेताच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
यापूर्वी आठ दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील इरपनार येथे बिलाशी आनंद बाला या महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतात काम करताना तसेच गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात जाताना नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
वाघांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, धोकादायक परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App