मोरगावात राऊतांच्या कार्यक्रमात राडा! माजी सैनिकाच्या मुद्द्यावरून महिलेचा सवाल; पोलिसांची कारवाई

विशेष प्रतिनिधी

बारामती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोरगाव येथे आयोजित रामरक्षा कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान एका महिलेने गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माजी सैनिकांच्या प्रश्नावरून संबंधित महिलेने राऊत यांना थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणत मोरगाव पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.

मोरगाव येथे आयोजित रामरक्षा कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांचे भाषण सुरू असताना एका महिलेने उभे राहत देशातील माजी सैनिकांचा अपमान होत असल्याचा आरोप केला. या प्रश्नावर कोणी बोलत का नाही, असा थेट सवाल तिने राऊत यांना केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

महिलेच्या या भूमिकेला उपस्थित शिवसैनिकांनी विरोध केला. यावेळी एका शिवसैनिकाने माईकवरून संबंधित महिलेवर आरोप करत ती तरडोली गावची ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच असल्याचे सांगितले. तिच्या कार्यकाळात गावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, तो झाकण्यासाठीच ती कार्यक्रमात गोंधळ घालण्यासाठी आल्याचा आरोप त्याने केला. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.



यावेळी शिवसैनिकांनी संबंधित महिलेला कार्यक्रमात व्यत्यय न आणण्यास सांगितले. “तुमचे म्हणणे मांडायचे असेल तर स्वतंत्र व्यासपीठ तयार करा,” असे सुनावत तिचा विरोध करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोरगाव पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप केला. पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर खासदार संजय राऊत कार्यक्रमस्थळावरून पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

या प्रकारामुळे मोरगाव परिसरात चर्चेला उधाण आले असून, कार्यक्रमादरम्यान महिलेने उपस्थित केलेला माजी सैनिकांचा प्रश्न आणि तिच्यावर करण्यात आलेले आरोप यामुळे या घटनेची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

Sanjay Raut’s Event Disrupted by Former Soldier’s wife

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात