विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवाजी पार्क येथे २ ऑक्टोबर रोजी नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्याबाबत मुंबईत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मरीन ड्राइव्ह परिसरात फलक घेऊन फिरत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा या व्हिडिओच्या आधारे केला जात आहे. मात्र, सीजेपीचे पदाधिकारी आशुतोष रांका यांनी दिपके यांना ताब्यात घेतल्याची बातमी फेटाळून लावली आहे. Abhijit Dipke
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात फलक घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू झाली. काही वृत्तांनुसार, त्यांना थोड्या काळासाठी ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. मात्र, या दाव्याला सीजेपीकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
CJP कडून अटकेची बातमी फेटाळली
सीजेपीचे पदाधिकारी आशुतोष रांका यांनी अभिजीत दिपके यांना अटक किंवा ताब्यात घेतल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत, ‘बनावट बातमी. दिपके यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. ते मुंबईच्या रस्त्यांवर फिरत आहेत,’ असे स्पष्ट केले. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ आणि त्यासोबत केले जाणारे दावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवाजी पार्क आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली
कॉकरोच जनता पार्टीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलनाऐवजी ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली होती. सामूहिक अटकेच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवण्याचा त्यांचा इरादा असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही अभिजीत दिपके यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास देशभरात आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले असून, अभिजीत दिपके यांना प्रत्यक्षात ताब्यात घेण्यात आले होते की नाही, याबाबत अधिकृत पोलिसी स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App