विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील शहरी भागात 10 टक्के पाणीकपात लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची चर्चा सुरू असली, तरी पुणे शहरात सध्या कोणतीही पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही. शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असून, शासनाचा संबंधित आदेश महापालिकेला अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहिती नंदकुमार जगताप यांनी दिली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये 10 टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेतली असता, सध्या कोणतीही कपात करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार पुढील नियोजन केले जाणार आहे.
पुण्यात दररोज 1,650 एमएलडी पाणी
पुणे शहरासाठी सध्या दररोज सुमारे 1,650 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलले जात आहे. शहरातील पाणीपुरवठा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांना तूर्तास पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.
मात्र, शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर कपात कशा पद्धतीने लागू करायची, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पाणीकपात लागू झाल्यास पाणीपुरवठ्याचे तास कमी केले जाणार की पाण्याचे प्रमाण घटविले जाणार, याबाबतही सध्या स्पष्टता नाही.
आयुक्त, पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय
शासनाचा आदेश महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्त आणि पक्षनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पुणे शहरात पाणीकपातीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
“संबंधित आदेश अद्याप आपल्याकडे आलेला नाही. आदेश प्राप्त झाल्यानंतर आयुक्त आणि पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ. सध्या शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू आहे,” असे नंदकुमार जगताप यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App