विशेष प्रतिनिधी
पुणे : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याचा योग्य गौरव व्हावा, यासाठी महाराष्ट्र विधानसभेने केंद्र सरकारकडे एकमताने शिफारस केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ‘ज्ञानाई ज्ञानशिल्प’ भित्तीचित्रांचे लोकार्पण सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिल्पकार नवीन शेगंबर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सावित्रीबाईंच्या संघर्षामुळे महिलांना नवी दिशा
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आज महिला विज्ञान, प्रशासन, संरक्षण, शेती, अंतराळ यांसह विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. महिलांच्या या प्रगतीमागे सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष आणि त्यांचे शैक्षणिक कार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारकडे भारतरत्नची शिफारस करण्यात आली आहे.
नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘ज्योती-सावित्री’ अभ्यास शाळाही उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ महाराष्ट्राचा आत्मा
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर हा केवळ इतिहास नाही, तर महाराष्ट्राचा आत्मा आणि वर्तमानाचा पाया आहे,’ असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. हा वैचारिक वारसा जपण्यासाठी अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत सातत्याने प्रयत्न केले. पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्यात फुले दाम्पत्याचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला असून, त्यासाठी विशेष निधीही उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना
‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ तसेच मुलींना मोफत उच्च शिक्षण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असल्याचे पवार यांनी सांगितले. महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर ओळख देणारे ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी सक्षमीकरण’ धोरण हा महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘ज्ञानाई ज्ञानशिल्प’ प्रेरणास्थळ ठरेल
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले की, विद्यापीठात उभारण्यात आलेली ‘ज्ञानाई ज्ञानशिल्पे’ ही केवळ कलाकृती नसून शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी प्रेरणास्थळे आहेत. ही शिल्पे विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले, तर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App