विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आधीच महागाईचा मोठा प्रश्न असताना आता वीज दरवाढीचा अतिरिक्त भार जनतेवर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाजनकोने वीज निर्मितीसाठी ३० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदीचे टेंडर काढले असून, या माध्यमातून महागडा कोळसा खरेदी केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. हे टेंडर तातडीने रद्द करावे, अशी मागणी पटोले यांनी केली. Nana Patole
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील आठवड्यात आपण कोळसा खरेदीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आता महाजनकोने ३० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदीसाठी आणखी एक टेंडर काढले आहे. यापूर्वी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून (WCL) चांगल्या प्रतीचा आणि तुलनेने कमी दरातील कोळसा खरेदी केला जात होता. हाच कोळसा गुजरात आणि कर्नाटकसह इतर राज्यांनाही पुरविला जातो, असा दावा त्यांनी केला.
‘टेंडरमधील स्पर्धा संपवून महागडा कोळसा का?’
कोळसा खरेदीच्या टेंडरमध्ये पुरेशी स्पर्धा असेल तर कमी दरात कोळसा उपलब्ध होऊ शकतो आणि त्याचा फायदा वीज ग्राहकांना मिळू शकतो. मात्र, सध्याच्या टेंडरमध्ये स्पर्धेला मर्यादा आणून विशिष्ट खासगी खाणीतून कोळसा खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
“महागडा आणि कमी दर्जाचा कोळसा खरेदी केला तर त्याचा थेट परिणाम वीज निर्मितीच्या खर्चावर होईल. परिणामी वीज दर वाढण्याची शक्यता आहे. हा अतिरिक्त भार सर्वसामान्य वीज ग्राहकांवर पडेल,” असे पटोले म्हणाले.
‘कोल वॉशरीमध्ये कोळसा पडून असताना नवीन खरेदी कशासाठी?’
राज्यातील कोल वॉशरीमध्ये सुमारे पाच लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध असल्याचा दावा करत हा कोळसा सरकार का खरेदी करत नाही, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. उपलब्ध कोळशाचा वापर करण्याऐवजी नव्याने महागडा कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा आर्थिक भार जनतेवर पडेल, असे त्यांनी म्हटले.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ३० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करावे. अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.
‘महागड्या विजेमुळे उद्योग राज्याबाहेर’
महाराष्ट्रातील ३३ मोठे उद्योग राज्याबाहेर गेले असून, त्यामागे महागडी वीज हेदेखील एक कारण असल्याचा दावा पटोले यांनी केला. गुजरात आणि कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अधिक असल्याचे सांगत, उद्योग राज्याबाहेर गेल्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत असून बेरोजगारी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
GDPच्या आकडेवारीवरही पटोलेंचा सवाल
देशाच्या GDP वाढीचा दर ७.८ टक्के असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे केला आहे. मात्र, या आकडेवारीवर अर्थतज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे पटोले यांनी म्हटले.
देशात महागाई वाढली आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे आणि शेती क्षेत्रही संकटात आहे. अशा परिस्थितीत GDP वाढीचा दर एवढा मोठा कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारकडून आकडेवारीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App