महाराष्ट्राच्या विकासाला उद्योगांची सामाजिक ताकद; गोदरेज समूह करणार २५ कोटींची गुंतवणूक, फडणवीसांची माहिती

आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रावर विशेष भर; पुढील तीन वर्षांत विविध सामाजिक उपक्रम राबविणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी राज्य सरकारकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या विकासप्रक्रियेत उद्योग क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या ‘गुड अँड ग्रीन’ उपक्रमांतर्गत पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रात २५ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य, महिला सक्षमीकरण, बांधकाम कामगार कल्याण, कृषी विकास आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोदरेज समूहाचा महाराष्ट्राशी १२० वर्षांहून अधिक काळापासून संबंध आहे. राज्यातील सामाजिक विकासाच्या विविध उपक्रमांमध्ये या समूहाचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. मलेरिया निर्मूलन आणि डेंग्यू नियंत्रणासाठी राज्यातील १६ हजार गावे आणि ९ हजार झोपडपट्ट्यांमध्ये आतापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. २०३० पर्यंत महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ९० हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना १८० कोटी रुपयांहून अधिक शासकीय निधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.



महिला सक्षमीकरणासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीवर भर

महिलांना घरमालकीचा हक्क मिळवून देणे, तसेच पदवीधर महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. पुढील तीन वर्षांत ८०० हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येणार आहे. १०० हून अधिक शेतकरी समूह सक्षम करून ५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्याचे नियोजन आहे. याशिवाय दुग्धव्यवसायाशी संबंधित ७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुवैद्यकीय सेवांचा लाभ दिला जाणार आहे.

जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठीही पुढाकार

नाशिक आणि बीड जिल्ह्यांत जलसंधारण, मृदसंधारण आणि भूजल पुनर्भरणाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांचा आतापर्यंत ३ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागपूरमध्ये एकात्मिक कचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०२५-२६ या वर्षात या उपक्रमांतर्गत ३५ हजार ३०२ मेट्रिक टनांहून अधिक कचरा पुनर्वापरासाठी वळविण्यात आला आहे. तसेच हरित बांधकाम साहित्य आणि प्लास्टिकला पर्याय ठरू शकणाऱ्या साहित्याच्या विकासासाठी संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

शासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वयातून सामाजिक विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाला अधिक गती मिळणार आहे. गोदरेज समूहाच्या या उपक्रमांमुळे राज्यातील आरोग्य, कृषी, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण क्षेत्राला पुढील काळात मोठा हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

Godrej Group to invest 25 crore, informs Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात