विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे ‘महालक्ष्मी सरस 2026’ चे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
देशात नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. महिला अर्थव्यवस्थेचा सक्रिय भाग बनल्यास देशाच्या विकासाला गती मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार, स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहे. ‘महालक्ष्मी सरस’मुळे बचत गटांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ व ग्राहक मिळून महिलांना अपेक्षित लाभ मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बचत गटांच्या उत्पादनांमध्ये आता केवळ गुणवत्ता नव्हे, तर आकर्षक पॅकेजिंग, उत्पादनाची माहिती, पोषणमूल्ये आणि वापर याबाबतची सविस्तर माहिती दिली जात असून त्यामुळे बचत गटांची स्पर्धात्मकता वाढली आहे. बचत गट आता मोठ्या बाजारपेठेत स्पर्धा करण्यास सक्षम झाले आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
– 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग
याशिवाय, ‘उमेद’ अंतर्गत उभारण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म हा एक व्हर्च्युअल मार्केटप्लेस म्हणून विकसित होत असून, ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रवाहात महिलांना स्थान मिळवून देण्यासाठी तो महत्त्वाचा ठरत आहे. या प्लॅटफॉर्मवर आज 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील महिला सक्षमीकरणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी योजना तयार करण्यात येईल. त्यामार्फत महिला बचत गटांना नर्सरी उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, याद्वारे महाराष्ट्राच्या 300 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि पर्यावरण संवर्धनात हातभार लावतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App