‘संविधानाशी खेळाल तर हात भाजतील!’; लोकतंत्र बचाओ रॅलीतून फडणवीसांचा राहुल गांधींना थेट इशारा

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नागपूर : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले पवित्र संविधान जोपर्यंत या देशात अस्तित्वात आहे, तोपर्यंत प्रत्येक लढाई संसदेच्या माध्यमातूनच लढली जाईल. पण राहुल गांधी म्हणतात की ‘आता लढाई संसदेत नाही, रस्त्यावर होईल’. जर रस्त्यावरच उतरून संघर्ष करायचा असेल, तर भाजप आणि एनडीएचा प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी तयार आहे. तुम्ही १०० जण येणार असाल तर आम्ही १,००० जण येऊ; तुम्ही १,००० जण येणार असाल तर आम्ही थेट लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू! राहुल गांधी, जर संविधानाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर तुमचे हात भाजल्याशिवाय राहणार नाहीत,” असा थेट आणि अत्यंत कडक इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे.

‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ या घोषवाक्याखाली आयोजित भव्य महारॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या कथित संविधान बचाव मोहिमेचा आणि विरोधकांच्या आंतरराष्ट्रीय नॅरेटिव्हचा अक्षरशः पंचनामा केला. ही लढाई भाजप, एनडीए किंवा नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सत्तेसाठी नसून देशाचे संविधान आणि लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

या महारॅलीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हेमंत जोशी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आकाश फुंडकर, अशोक उईके, पंकज भोयर, आशिष जयस्वाल, संजय कुटे यांच्यासह महायुतीचे अनेक बडे नेते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका हातात संविधानाचे मुखपृष्ठ, आतमध्ये मात्र लाल विचारांचे पुस्तक!

राहुल गांधी यांच्या हातातील लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतीवर निशाणा साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी एका हातात संविधानाची प्रत दाखवतात; मात्र दुसऱ्या बाजूला संविधानाने निर्माण केलेल्या स्वायत्त संस्थांना बदनाम करण्याची मोहीम राबवत आहेत. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, संसद, रिझर्व्ह बँक (RBI) आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांसारख्या संस्थांवर जाणीवपूर्वक अविश्वास निर्माण करून देशातील संपूर्ण लोकशाही चौकट खिळखिळी करण्याचा हा कट आहे.”

मूलभूत विचारांशी प्रतारणा

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाशी विसंगत असलेले डावे, अराजकतावादी आणि लाल विचार घेऊन काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे. आधी संस्थांवर संशय निर्माण करायचा आणि नंतर संपूर्ण संविधानच बदलण्याची भूमिका घ्यायची, हा यांचा सुप्त अजेंडा आहे.”

१९७५च्या आणीबाणीचा दाखला

काँग्रेसला संविधानाचा इतिहास आठवून देताना त्यांनी १९७५ मधील आणीबाणीचा पाढा वाचला. “डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक नागरिकाला समान मूलभूत अधिकार दिले आहेत. सरकारने हे अधिकार हिरावून घेतल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तरतूद घटनेने केली. पण १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवून न्यायालयात जाण्याचे दरवाजेच बंद केले होते.”

स्वतःच्या संरक्षणासाठी घटनादुरुस्ती

“अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापासून स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी काँग्रेसने संविधानात बेकायदेशीर फेरबदल केले. अखेर १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर संविधानातील मूलभूत अधिकार पुन्हा पूर्ववत करण्यात आले.”

भारतात ‘रेजिम चेंज’चे आंतरराष्ट्रीय षडयंत्र

शेजारील देशांमधील अशांततेचा संदर्भ देत फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा पर्दाफाश केला. “नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये ज्या पद्धतीने हिंसक आंदोलने घडवून सत्ताबदल (Regime Change) करण्यात आले, तशीच अस्थिर आणि अराजक परिस्थिती भारतात निर्माण करण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान राहुल गांधी यांच्या माध्यमातून रचले जात आहे.”



१४० कोटी जनता हे हाणून पाडेल

“भारत हा बांगलादेश किंवा श्रीलंका नाही. भारताचे संविधान आणि येथील १४० कोटी जनता अत्यंत मजबूत आहे. जे कोणी परकीय शक्तींच्या तालावर नाचून देशातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतील, त्यांना जनता निवडणुकीच्या मैदानात कायमचा धडा शिकवेल.”

पराभव दिसताच ईव्हीएमवर खापर!

काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या मतचोरी आणि ईव्हीएमच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सवाल उपस्थित केले. “जेव्हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा गुजरातमध्ये भाजप प्रचंड बहुमताने जिंकतो, तेव्हा ईव्हीएम खराब होते आणि लोकशाही धोक्यात येते. पण जेव्हा कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश किंवा केरळमध्ये काँग्रेसचे १०० खासदार व आमदार निवडून येतात, तेव्हा लोकशाही सुरक्षित कशी काय राहते? हा विरोधकांचा दुटप्पीपणा जनतेला कळून चुकला आहे.”

बांगलादेशी घुसखोरांना मतदानाचा हक्क देणार नाही

“मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असताना काँग्रेस का ओरडत आहे? कारण भारताच्या मतदार यादीत बेकायदेशीरपणे समाविष्ट झालेली बांगलादेशी घुसखोरांची नावे काढली जात आहेत. आम्ही देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एकाही बांगलादेशी घुसखोराला मतदानाचा अधिकार मिळू देणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकशाही रक्षणासाठी ही तर केवळ सुरुवात; शेवटपर्यंत लढू!

भाषणाच्या शेवटी कार्यकर्त्यांना आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राहुल गांधी आणि काँग्रेसचे संविधानविरोधी व लोकशाहीविरोधी छुपे मनसुबे जोपर्यंत पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाहीत, तोपर्यंत आमचा हा वैचारिक आणि रस्त्यावरील लढा अखंड सुरूच राहील. लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेने आणि प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज राहावे.”

Devendra Fadnavis Warns Rahul Gandhi at Loktantra Bachao Rally in Nagpur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात