विशेष प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या निमित्ताने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गुरुवारी एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित राजकीय भेटीची नोंद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी थेट रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. वरकरणी ही भेट तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असलेली सदिच्छा भेट भासत असली, तरी या बंद दाराआड झालेल्या चर्चेत साहेबांनी पटेल यांच्याकडे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या नुकत्याच पार पडलेल्या वादळी दिल्ली दौऱ्याबाबत विचारणा केल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या एका प्रश्नामुळे महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना प्रचंड उधाण आले आहे.Praful Patel Meets Sharad Pawa
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चाचण्या सुरू असतानाच राजकीय नेत्यांची रुग्णालयात रीघ लागली आहे.
दिल्लीत अमित शहांच्या भेटीचा हेतू काय?; पवारांचा थेट रोखठोक सवाल
ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार आणि त्यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांच्यात काही काळ एकांतात चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकृतीची चौकशी झाल्यानंतर शरद पवार यांनी नेहमीच्या खास शैलीत प्रफुल्ल पटेल यांना छेडले. 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अजित पवार गटाच्या कोअर टीमने दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीचा मूळ हेतू काय होता आणि त्या बैठकीत नेमके काय ठरले, याबाबत साहेबांनी थेट माहिती विचारल्याचे समजते.
पटेल माध्यमांसमोर सावध
भेटीनंतर बाहेर पडताच प्रफुल्ल पटेल यांनी राजकीय चर्चांचा चेंडू टोलवला. “पवार साहेबांची प्रकृती अतिशय उत्तम असून ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्यांनी नेहमीच्या आपुलकीने चौकशी केली. सध्या राज्यात काय सुरू आहे, यावर सामान्य गप्पा झाल्या,” असे पटेल म्हणाले. मात्र, अमित शाह यांच्या भेटीबाबत साहेबांनी विचारलेल्या प्रश्नावर पटेल यांनी माध्यमांसमोर मौन बाळगणेच पसंत केले.
१ नोव्हेंबरची ती ‘मध्यरात्रीची दिल्ली बैठक’ अन् सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती
प्रफुल्ल पटेल यांच्या या रुग्णालयातील भेटीला राजकीय महत्त्व का प्राप्त झाले, याचे मूळ १ नोव्हेंबरच्या दिल्ली भेटीत दडलेले आहे. 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील बडे नेते—प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ—हे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला दिल्लीत दाखल झाले होते.
सुनेत्रा पवार गैरहजर राहिल्याने संशय
या बैठकीत सर्वात जास्त भुवया उंचावणारी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती होती. पक्षाच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवारांना वगळून पक्षातील ज्येष्ठ नेते परस्पर अमित शाह यांच्यासोबत खलबते करायला गेल्यामुळे पक्षात मोठी धुसफूस सुरू झाली होती.
दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवारांनी बोलावली आमदारांची तातडीची बैठक!
दिल्लीतील या गुप्त बैठकीचे पडसाद महाराष्ट्रात तात्काळ उमटले. दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत परतताच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली.
संघटना कमकुवत होण्याची भीती
बैठकीत आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील निधीचा प्रश्न, महायुतीतील अंतर्गत ताणतणाव आणि वरिष्ठ नेत्यांमधील विसंवादामुळे संघटना कमकुवत होत असल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. पक्षात एकवाक्यता राहावी आणि नेत्यांनी परस्पर निर्णय घेणे टाळावे, असा सूर आमदारांच्या बैठकीत उमटला होता.
दोन्ही राष्ट्रवादींचे मनोमिलन की दबावाचे राजकारण?
दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम आणि स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनीही रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली.
समीकरणांची जुळवाजुळव?
आता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडीत जाऊन घेतलेली भेट ही केवळ साहेबांच्या तब्येतीपुरती मर्यादित आहे की अजित पवार गटातील अंतर्गत संघर्षातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अमित शाह यांच्या भेटीवरून पक्षांतर्गत वाढलेला तणाव आणि आता थेट शरद पवारांनी घेतलेली त्या दौऱ्याची झाडाझडती, यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App