विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhaskar Jadhav शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डरो मत, बिलकुल डरो मत… जो होनेवाला वो होने ही वाला है,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षासाठी हा मोठा धक्का असला तरी खचून न जाता नव्याने संघटन उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Bhaskar Jadhav
‘हे दिवसही जातील; पक्षाला नवसंजीवनी देण्याची वेळ’
भास्कर जाधव म्हणाले, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगेन की, डरो मत, बिलकुल डरो मत… चिंता करू नका. जे होणार आहे ते होणारच आहे. मात्र, हे दिवसही निघून जातील. त्यासाठी आता काही कार्यक्रम आखावे लागतील, काही ठोस निर्णय घ्यावे लागतील आणि पक्षाची पुढील भूमिका निश्चित करावी लागेल.”Bhaskar Jadhav
त्यांनी सूचक शब्दांत संघटनात्मक बदलांचीही गरज व्यक्त केली. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी नेतृत्वाने काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
‘दीड-दोन वर्षांपासून अफवांचे राजकारण सुरू’
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सातत्याने उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटणार, खासदार वेगळा गट स्थापन करणार किंवा दुसऱ्या पक्षात जाणार अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही जाधव यांनी केला.
“आज केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पण सत्तेइतकीच समाजातील विश्वासार्हता महत्त्वाची असते. आज हा पक्ष फोडणार, उद्या तो पक्ष फोडणार, अशा चर्चा सातत्याने घडवल्या जात आहेत. दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेऊन पक्षाची सूज वाढवता येईल; पण त्यामुळे समाजातील प्रतिष्ठा आणि विश्वास वाढत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
‘पक्ष फोडून सत्ता वाढवण्याचा प्रयत्न’
भाजपवर थेट निशाणा साधताना जाधव म्हणाले की, लोकशाहीत मतभेद आणि पक्षांतरे नवीन नाहीत. मात्र, विरोधी पक्षांना संपवण्याची मानसिकता धोकादायक आहे.
“ही लोकशाही आहे. येथे कधी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर पक्षांविषयी बोलणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे. आज देशात ज्या पद्धतीने छोटे-मोठे पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते लोकशाहीसाठी चांगले संकेत नाहीत,” असे त्यांनी म्हटले.
‘काँग्रेसने विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला नव्हता’
भाजपच्या राजकारणावर टीका करताना जाधव यांनी काँग्रेसचे उदाहरण दिले. “सतत 70 वर्षे काँग्रेसने काय केले असा प्रश्न विचारला जातो. काँग्रेसच्या काळातही पक्षांतरे झाली, नेते पक्ष सोडून गेले. पण विरोधी पक्षांना पूर्णपणे संपवून टाकण्याचा किंवा देशात एकच पक्ष उरावा असा दुष्ट हेतू काँग्रेसने कधी ठेवला नाही,” असे ते म्हणाले.
उद्धव सेनेसमोर नवे आव्हान
सहा खासदारांच्या संभाव्य बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर संघटनात्मक आणि राजकीय असे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे पक्षातील गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवण्याचे आव्हानही आहे. अशा परिस्थितीत भास्कर जाधव यांनी दिलेला “डरो मत” हा संदेश केवळ उद्धव ठाकरेंसाठीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे गटासाठी धीर देणारा मानला जात आहे.
‘संकटातून मार्ग काढा’ हा अप्रत्यक्ष संदेश
भास्कर जाधव यांच्या वक्तव्यातून पक्ष नेतृत्वाने आता आत्मपरीक्षण करून नव्या रणनीतीसह पुढे जाण्याची गरज असल्याचा संदेशही स्पष्टपणे दिसून येतो. खासदारांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या राजकीय धक्क्यातून सावरण्यासाठी संघटन बळकट करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीने विश्वास निर्माण करणे हेच ठाकरे गटासमोरील पुढचे मोठे आव्हान ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App