विशेष प्रतिनिधी
मुंबई / पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन बिल, केंद्रीय मंत्रिपद, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डिलिमिटेशन बिलासाठी पक्षाचे खासदार भाजपच्या जाळ्यात अडकले असल्याच्या आणि स्वतःचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळासाठी घेतले जात असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. एकतर आमचा गट नाही तर पक्ष आहे आणि हे विधेयक अद्याप आमच्याकडे आलेले नाही; बिल समोर आल्यानंतर पक्ष त्यावर सविस्तर भूमिका मांडेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थिती आणि सोन्या-चांदीच्या दरांबाबत भूमिका
राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचत नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, हा प्रश्न अतिशय चिंताजनक असून आम्ही स्वतः दर आठवड्याला मतदारसंघात याचा आढावा घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहून शेवटच्या माणसापर्यंत मदत कशी पोहोचेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, सोन्या-चांदीच्या कमी होत असलेल्या भावांबाबत विचारले असता, किमती उतरताना दिसत असल्या तरी अजून त्यात स्थिरता आलेली नाही; हे भाव उतरण्याचे नेमके कारण येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार
दरम्यान, ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणावर आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारचे लक्ष वेधले. राम पूर्णेकर यांनी नुकतीच आपली भेट घेतली असून ते अस्वस्थ आहेत आणि आपल्या कुटुंबीयांना न्याय मिळावा हीच त्यांची अपेक्षा असल्याचे सुळे यांनी सांगितले. आगामी हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी योग्य ती मागणी करून न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना पक्षाच्या सर्व आमदारांना दिल्या आहेत. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली असून यासंदर्भात गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले होते; त्यामुळे या गंभीर विषयावर हिवाळी अधिवेशनात सविस्तर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App